बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

- अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील संजयनगर येथील घटना - वनविभागाच्या विरोधात गावकर्‍यांमध्ये संताप

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
गोंदिया,
leopard attack घरासमोरील अंगणात लघुशंकेसाठी गेलेल्या एका पाच वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार २५ सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रातील संजयनगर (बंगाली कॅम्प) येथे घडली. वंश प्रकाश मंडळ (५) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
 
 

lepord attak 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार वंशचे आई-वडील हे रोजगारासाठी गुजरात येथे गेले असून वंश आपल्या आजीसोबत मुळगाव संजय नगर येथे राहते. दरम्यान, आज, पहाटे पाच वाजताच्या सुमारास लघुशंकेकरिता तो अंगणात गेला असता घराशेजारीच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. यावेळी घराच्या दारात उभी असलेल्या वंशाच्या आजीने आरडा-ओरड केली असता बिबट्याने त्याला ओढत जंगल परिसराकडे घेऊन गेला. आवाज ऐकून शेजारच्या लोकांनी जंगलाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत बिबट्याने वंशाच्या नरडीचा घोट घेतला. दरम्यान नागरिकांना पाहून बिबट्या घटनास्थळावरून पळ काढला. वंशला उपचारासाठी केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती वन विभाग गोठणगाव व केशोरी पोलिसांना देण्यात आली.leopard attack विशेष म्हणजे, परिसरात बिबट्या धुमाकूळ घातला असताना वनविभागाकडून अद्यापही त्याचा बंदोबस्त केला नाही. त्यातच आज, ही घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये वन विभागाच्या विरोधात कमालीचा रोष आहे.
  
वर्षभरात चौथी घटना....
गोठणगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये बिबट्याने लहान मुलांवर हल्ला केल्याची वर्षभरातील ही चौथी घटना असून यापूर्वी गेल्या वर्षी १ डिसेंबर रोजी मंडई उत्सवात एका चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. त्यानंतर ३० मे २०२५ रोजी अंगणात खेळत असलेल्या मुलांवर तर मागील महिन्यात २९ ऑगस्ट रोजी इटियाडोह धरण परिसरात काकासोबत फिरायला गेलेल्या चिमुकल्यावर बिबटने हल्ला करून जखमी केले होते. त्यातच आज, अखेर बिबट्याने वंशचा जीव घेतला.
गावकऱ्यांचा चक्का जाम, तोडफोड...
गोठणगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या संजयनगर, बोंडगाव सुरबन परिसरात बिबट्याचे धुमाकूळ असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती. मात्र, वनविभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यात आज ही घटना घडली. तेव्हा संतापलेल्या नागरिकांनी वनविभागाच्या विरोधात रोष व्यक्त करत सकाळी ७ वाजतापासून केशोरी- नवेगाव मार्ग पूर्णपणे बंद करून रस्ता रोको आंदोलन सुरू केला असून तोडफोड करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.