अनिल कांबळे
नागपूर,
Bombay High Court judgment फक्त परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित हत्याकांडासारख्या गंभीर स्वरुपाच्या प्रकरणात केवळ संशयाच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला दाेषी ठरवता येत नाही. स्थिती कितीही संशयास्पद वाटली तरी ती शिक्षेचे कारण बनू शकत नाही. परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी पूर्ण हाेत नसल्यामुळे, आराेपीला दाेषी ठरवता येणार नाही, असे स्पष्ट करीत उच्च न्यायालयाने एका हत्याकांडातील आराेपीला तात्काळ साेडण्याचे आदेश दिले. तसेच सत्र न्यायालयाने त्या आराेपीला दिलेली जन्मठेपेची शिक्षासुद्धा रद्द केली. जीवन उफर् अशाेक चपाणे असे आराेपीचे नाव आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण निकालात एका विद्यार्थीनीच्या हत्या प्रकरणातील आराेपी जीवन उफर् अशाेक चपाणे याची निर्दाेष सुटका केली आहे. नागपूर सत्र न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आराेपी जीवन चपाणे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली हाेती, मात्र उच्च न्यायालयाने हा निकाल रद्द केला. केवळ संशयाच्या आधारावर शिक्षा देता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्या.अनिल पानसरे व न्या. सिद्धेश्वर ठाेंबरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. 15 सप्टेंबर 2015 राेजी 20 वर्षीय युगंधरा या तरुणीचा मृतदेह इसासनी कॅम्प येथील मिहान परिसरात अर्धनग्न अवस्थेत सापडला हाेता. तिच्या चेहèयावर ओरखडे, गळ्यावर आवळल्याच्या खुणा आणि हातांवर जखमा हाेत्या.
या प्रकरणात, पाेलिसांनी जीवन चपाणे याला अटक केली. ताे युगंधराच्या लहान बहिणीच्या शाळेच्या व्हॅनचा चालक हाेता. आराेपानुसार, 15 सप्टेंबर राेजी त्याने युगंधराला व्हॅनमध्ये बसवून मिहान परिसरात नेले आणि तिथे तिचा खून केला. उच्च न्यायालयाने या प्रकरणातील पुराव्यांची सखाेल तपासणी केली आणि ते अपूरे असल्याचे नमूद केले. परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित प्रकरणांमध्ये, प्रत्येक पुरावा एकमेकांशी जाेडलेला असणे आवश्यक आहे. मात्र, या प्रकरणात तसे दिसून आले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नाेंदविले.