वर्धा,
Axis Bank : पोलिस अधीक्षक अनुराग जैन व अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या सुचनेनुसार अॅसिस बँक कर्ज फसवणूक प्रकरणाच्या तपासाला आर्थिक गुन्हे शाखेकडून गती देण्यात आली आहे. वर्धा शाखेतून ज्या २० जणांच्या नावाने आरोपींनी २.५५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते त्यांची आता पोलिसांकडून चौकशीच्या नावावर झाडाझडतीच घेतली जात आहे. पोलिसांनी यापैकी रवींद्र गोमासे आणि स्वाती मगर यांची पडताळणी केली आहे. कर्जाच्या कागदपत्रांवर चुकीचे पत्ते सूचीबद्ध असल्याने पोलिसांना इतरांना शोधण्यात अडचणी येत आहे. संपूर्ण प्रकरणाचे सूत्रधार अनंता इंगळे आणि अनुप बनसोड यांचाही शोध सुरू आहे.

आरोपींनी रिलेशनशिप एसआयपी अधिकार्यामार्फत काही गरिबांकडून कागदपत्रे मिळवल्याचे आतापर्यंतच्या पोलिस तपासात उघड झाले आहे. या कागदपत्रांसह बनावट कागदपत्रे वापरून त्यांच्या नावाने कर्ज काढण्यात आली. भामटीपुरा येथील अॅसिस बँकेच्या शाखेतून २० जणांच्या नावावर कर्ज काढण्यात आले. यात ललित थोरात यांच्या नावाने १५ लाख, विनोद बोरकर यांच्या नावाने १५ लाख, स्वाती मगर यांच्या नावाने १५ लाख, मीनाक्षी गेडाम २२ लाख, अतिक रफिक शेख १५ लाख, रवींद्र गोमासे १५ लाख, गजानन गहूकर १५ लाख, सचिन लडके १५ लाख, संदीप मंडरे १५ लाख, निशांत ओगले १५ लाख रुपये, संतोष मोनातुरे १५ लाख रुपये, मंगेश जाधव ५ लाख, दीपक माहुलकर १५ लाख, प्रफुल्ल इंगोले १४ लाख ८२ हजार, मीना वैरागडे ५ लाख, करण आमटे ५ लाख, संतोष गवई १५ लाख, अमित कुलकर्णी १५ लाख आणि रणजित वंजारी यांच्या नावावर १० लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले.
आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी या सर्वांची आळीपाळीने पडताळणी करत आहे. कागदपत्रांवर सर्वांचे चुकीचे पत्ते देण्यात आले आहे. बँक कर्ज प्रकरणाचा संबंध जीएस फायनान्स कंपनीशीही आहे. परिणामी, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस तुरुंगात असलेल्या जीएस कंपनीच्या फसवणुकीतील आरोपी गजानन सातव आणि स्वाती मगर यांना ताब्यात घेण्याची तयारी करत आहेत. त्यानंतर पुन्हा काही गंभीर खुलासे होण्याची शयता आहे.