घोराड,
Bhondai Mata : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या बोरी बोरधरणाचे ग्रामदैवत व असंख्य भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या भोंडाई मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दुरुवरून भाविक येत असल्याने भाविकांची गर्दी वाढली आहे. मंदिराला प्रमाणात रोषणाई करून सजावट करण्यात आली आहे. बोरी बोरधरणची आई नवसाला पावणारी असल्याचे गावकर्यांकडून बोलले जाते.
२२ रोजी घटस्थापना करण्यात आली. सेलू येथून अवघ्या १५ किलोमिटर अंतरावर बोर व्याघ्र प्रकल्पाला लागून निसर्गाच्या कुशीत असणारे मनप्रसन्न करणारे हे मंदिर आहे. येथून लागूनच बोर व्याघ्र प्रकल्प तर सेलू तालुयातील सर्वात मोठे बोरधरण आहे. याच परिसरात भाविकांना अनेकवेळा वाघोबाचे दर्शन सुद्धा होते. अलीकडच्या काळात सिमेंट विटाने बांधलेल्या ओट्यावर मंदिराचे बांधकाम व सभामंडप भतांच्या व गावातील दानदात्यांच्या मदतीने बांधकाम करून कायापालट करण्यासाठी देवस्थान कमिटीने पुढाकार घेतला आहे.
दरवर्षी नवरात्रोत्सवात भोंडाई मातेची नित्य नियमाने पूजा, आरती मंदिराच्या पुजार्यामार्फत करण्यात येत असते. उत्सवादरम्यान रोज पहाटे काकड आरती व सायंकाळी ७ वाजता सांज आरती करण्यात येते. नवमीच्या दिवशी दुपारी १ वाजता पासून महाप्रसाद सुरू करण्यात येणार आहे, असे विश्वस्तांनी सांगितले. येथे सर्व व्यवस्था बालू डेकाटे, श्रीकांत कोकाटे, दुर्गेश बावणे, सागर वानखेडे, सुधीर चौधरी, मनोज करपाते, राजू कुभरे पाहत आहेत.
देवीच्या दर्शनाला वाघोबा...
बोर धारण परिसरात जंगल व्याप्त भागात हे मंदिर असून बोरी गावापासून दीड किमी अंतर पायी चालत जावे लागत होते. अलीकडच्या काळात या देवस्थानापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता तयार करण्यात आला आहे. बोर धरण पाहण्यासाठी येणारे असंख्य पर्यटक भोंडाई मातेचे दर्शन घेतात. या मंदिराजवळ रात्रीच्या वेळी वाघ येत असल्याचे सांगितल्या जाते.