चंद्रपूर,
rain-Chandrapur-Irai Dam : जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून गुरूवारी, दूपारी 12 वाजेपर्यंत सर्वत्र संततधार पाऊस झाला. या पावसामुळे इरई धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाच दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, अतिवृष्टीच्या पृष्ठभूमीवर गुरूवारी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. या पावसाचा सोयाबीन, कापूस व धान पिकांना मोठा फटका बसला आहे.
संततधार पावसामुळे सध्यस्थितीत इरई धरणाची पाणी पातळी 207.375 मीटर पर्यंत पोहोचली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी आधी तीन दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले होते. त्यानंतर आणखी दोन दरवाजे 0.25 मीटरने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नदीपात्र ओलांडू नये आणि जनावरांना नदीकाठी सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व संबंधितांनी ही माहिती त्यांच्या संपर्कातील सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राने गुरूवारी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. या दिवशी काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच खाजगी शिकवणी वर्ग यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. तर, सुरू असलेल्या शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना सकाळी 11 वाजेपर्यंंत घरी सोडण्याचा आदेश जिल्हाधिकारी दिला.
सिंदेवाही, ब्रम्हपुरी, पोंभुर्णा, चिमूर, बल्लारपूर, नागभीड, मूल व भद्रावती तालुक्यांमध्ये बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन, कापूस आणि धान पिकांना बसला आहे. नुकत्याच शेतात भरभराटीला आलेली सोयाबीनची शेंगा, कापसाची कोवळी फळे तसेच धानाची नासाडी होत आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांची वाढ खुंटण्याची व उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी वर्ग मात्र या अनियमित पावसामुळे हतबल झाला असून, मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने नुकसानीचा प्राथमिक आढावा घेण्याची तयारी सुरु केली आहे.
भिवकुंड येथे घर कोसळले
बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड येथे अतिवृष्टीमुळे गुरूवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास ललिता नामदेव बोरकुंटला यांचे घर कोसळले. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संसार उघड्यावर आला आहे. स्थानिक प्रशासनाने पंचनामा करून मदतकार्य सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बल्लारपूर तालुक्यात सर्वाधीक पाऊस
मागील 24 तासात जिल्ह्यात 28.1 मीमी पावसाची नोंद झाली आहे. बल्लारपूर तालुक्यात सर्वाधिक 45.8 मिमी पाऊस पडला. तर, सिंदेवाही तालुक्यात 45.6 मिमी, ब्रम्हपुरी 45.2 मिमी, पोंभुर्णा 42.6 मिमी, सावली 37.4 मिमी, नागभीड 34.8 मिमी, चंद्रपूर 33.1 मिमी, मूल 29.7 मिमी, भद्रावती 22.8 मिमी, जिवती 18.9 मिमी, चिमूर 18 मिमी, गोंडपिपरी 17.4, वरोडा 17.3 मिमी, कोरपना 16.8 मिमी, तर राजुरा तालुक्यात 26.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.