नागपूर,
drug trafficking Nagpur, एमडी पावडर विक्रीसाठी जात असलेल्या तस्कराच्या सोनेगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शरद कातलाम (24) रा. चचभवन असे अटकेतील तस्कराचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन मगर यांना गोपनीय माहिती मिळाली की, शरद अमली पदार्थाची विक्री करतो. मगर यांनी मिळालेल्या माहितीची खात्री करून घेतली आणि त्याच्या अटकेसाठी सापळा रचला. आधीच दबा धरून बसले असलेल्या पोलिसांनी वर्धा मार्गाने रात्री दुचाकीने अमली पदार्थ देण्यासाठी जात असलेल्या आरोपीला थांबविले. विचारपूस करून दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता आरोपीजवळ 60 हजार रुपये किमतीची 6 ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. पोलिसांनी मुद्देमालासह त्याची दुचाकी आणि मोबाईल जप्त केला. सखोल चौकशीत अमली पदार्थ त्याने मनीषनगरातील एका युवकाकडून आणल्याचे पोलिसांना सांगितले. ही कारवाई पोलिस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी, सहायक पोलिस आयुक्त अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनात वपोनि नितीन मगर, अचल कपूर, उपनिरीक्षक राजेश राठोड, विक्रांत काटरकर, रणधीर रोकडे, पोहवा राजेश मसराम, हमत सहारे, मंगेश गाडगे यांनी केली.
कारने विकायचे अमली पदार्थ
कारने फिरून एमडी पावडर विक्री करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. मुकेश ऊर्फ राजा ठाकरे (27), राजा मानकर (23) दोन्ही रा. पारडी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकातील अधिकारी, अंमलदार हे कळमना परिसरात गस्तीवर असताना एम. बी. टाऊन चौकात दोन्ही आरोपी एका पांढऱ्या रंगाच्या कारजवळ उभे होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. पंचांसमक्ष अंग झडती घेतली असता त्यांच्याजवळ 2.40 ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. त्यांच्या ताब्यातून अमली पदार्थासह कार, मोबाईल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.