नागपूर,
Durga Marshal Nagpur महिला, विद्यार्थिनी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांनी आता दुर्गेचे रूप धारण केले आहे. त्यामुळे महिलांनो आता घाबरू नका, तुमच्या सोबतीला दुर्गा मार्शल आहेत. पोलिस ठाण्यातील दुर्गा मार्शल विकृत मानसिकतेच्या लोकांवर लक्ष ठेवतील आणि महिलांना सुरक्षा प्रदान करतील. या अभिनव उपक्रमाचा पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते शुभारंभ झाला. पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांच्या कल्पक उपक्रमामुळे महिलांना सुरक्षा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांच्या मार्गदर्शनात परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांनी नवरात्रोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात साकारली. या उपक्रमांतर्गत सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, वाठोडा, अजनी, हुडकेश्वर आणि बेलतरोडी या ठिकाणी प्रत्येकी दोन महिला अंमलदार कार्यरत राहणार असून, दुपारी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत मोपेडवर गस्त घालतील. नवरात्र दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने महिला, मुली, विद्यार्थिनी तसेच बालकांना सुरक्षिततेची जाणीव करून देतील. उत्सवाच्या पृष्ठभूमीवर सुरक्षित वातावरण निर्माण करणे, तत्काळ मदत पोहोचविणे, गरबा, दांडिया कार्यक्रमाच्या ठिकाणी तसेच शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षेच्या दृष्टीने सतत गस्त घालणार आहेत. शिकवणी वर्गात ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींची छेडखानी होणार नाही, यासाठी गस्त असेल. झालीच तर त्वरित कारवाई करून अटक करण्यात येईल. उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी एसीपी हिवरे आणि आठही ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
परिमंडळ दोनमध्ये शुभारंभ
दुर्गा मार्शल उपक्रमाचा परिमंडळ दोनमध्ये गुरुवारी सायंकाळी शुभारंभ झाला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी हिरवी झेंडी दाखवून दुर्गा मार्शलला रवाना केले. परिमंडळ दोनअंतर्गत सदर, मानकापूर, गिट्टीखदान, सीताबर्डी, धंतोली आणि अंबाझरी ठाण्यांत दुर्गा मार्शल असतील. यानंतर शहरात हा अभिनव उपक्रम राबविण्याचा मानस आहे.