नवी दिल्ली
election commission केंद्रीय निवडणूक आयोगानं मतमोजणी प्रक्रियेत मोठा बदल करत एक नवा नियम लागू केला आहे. या निर्णयामुळे आगामी निवडणुकांमध्ये मतमोजणी अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि वेगवान होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, यापुढे पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण होईपर्यंत ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) मतांची शेवटच्या दुसऱ्या फेरीपासून मोजणी सुरू करता येणार नाही.
आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएम यांची मोजणी जवळपास एकाच वेळी सुरू केली जात होती. मात्र, यामुळे अनेक वेळा भ्रम निर्माण होऊन वादविवाद, तक्रारी, आणि गोंधळाच्या घटना घडल्या होत्या. यावर उपाय म्हणून आयोगानं हा नवा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार, मतमोजणीचा एक सुस्पष्ट आणि सुसंगत अनुक्रम ठरवण्यात आला असून, पोस्टल बॅलेट पूर्ण मोजल्यानंतरच ईव्हीएमच्या अंतिम फेऱ्यांची मोजणी सुरू होईल.
गेल्या काही election commission निवडणुकांमध्ये पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः दिव्यांग मतदार आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे ही वाढ लक्षणीय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर, या मतांची अचूक आणि वेळेत मोजणी होण्यासाठी आयोगानं सर्व राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार अधिक मोजणी टेबल्स आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.या निर्णयामुळे मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि अंतिम निकाल जाहीर करण्यात होणारा विलंबही टळेल. निवडणूक प्रक्रियेतील प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि निष्पक्षतेबाबत मतदार, उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्यात विश्वास निर्माण होईल, अशी अपेक्षा निवडणूक आयोगानं व्यक्त केली आहे.यापूर्वी आयोगानं मतदारयादीतून नाव वगळण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठीही पावले उचलली होती. आता मतमोजणी प्रक्रियेसंदर्भातील या नव्या निर्णयामुळे एकंदर निवडणूक व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक आणि विश्वासार्ह होण्याची शक्यता आहे.