देवळी,
Rajesh Bakane : अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शासनाकडून शेतकर्यांना दिलासा मिळावा यासाठी नियमांच्या अडथळ्यांत न अडकता मदत करावी, अशी भूमिका आ. राजेश बकाने यांनी मांडली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, तहसीलदार समर्थ क्षीरसागर, तहसीलदार संदीप पुंडेकर, नायब तहसीलदार सागर कांबळे आदी उपस्थित होते.
आ. बकाने म्हणाले की, शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आहे. तेव्हा शासकीय कागदोपत्री प्रक्रिया शेतकर्यांसाठी ओझे ठरू नये. नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत मिळवून देणे हेच सर्वांचे प्राधान्य असले पाहिजे. नियमांवर बोट ठेवून मदत अडवली गेली तर ते अन्यायकारक ठरेल. मागील आठवडाभरापासून अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देऊन शेतकर्यांशी संवाद साधला आहे. सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान, पाण्याखाली आलेली शेतजमीन, पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे प्रत्यक्ष अनुभवले. शेतकरी आता भरभरून उत्पादनाची अपेक्षा करत असतानाच निसर्गाने खेळी केली. त्यामुळे ही वेळ शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आहे, असेही आ. बकाने म्हणाले.
पंचनामे प्रामाणिकपणे व तातडीने पूर्ण व्हावेत, शेतकर्यांच्या याद्या वेळेत पोर्टलवर अपलोड व्हाव्यात आणि ई-केवायसी मोहिमेद्वारे मदत त्यांच्या खात्यावर पोहोचली पाहिजे, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाला त्यांनी दिल्या. यासोबतच अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेले रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठीही आ. बकाने यांनी शासनाकडे तातडीने निधी मागण्याची गरज व्यत केली. नागरिकांच्या दैनंदिन हालचाली थांबू नयेत म्हणून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती ताबडतोब व्हावी, असेही ते म्हणाले.