वर्धा,
wet drought : वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई व शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना व युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने आज गुरुवार २५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यात पेरणीच्या दिवसांपासून पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर यासारखी महत्त्वाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. लाखो हेटर शेती पाण्याखाली गेली आहेत.
सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सोयाबीन पीक पिवळे पडले. शेंगा गळून पडल्या. कपाशी व तूर पिकांमध्ये मर रोग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे कपाशी व तूर पिकांच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा १३७ टके पाऊस जास्त झाला आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्हाभरात प्रचंड नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, शासनाने निकष बदलवून २ हेटरची मर्यादा ठेवू नये, नुकसानग्रस्त शेतकर्यांना प्रति हेटर ५० हजार रुपये सरसकट भरपाई द्यावी, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी तातडीने जाहीर करावी, जुनी पीकविमा पद्धत ठेवून त्याचे निकष बदलवू नये, स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी तात्काळ लागू कराव्या, हमीभावाचा कायदा तात्काळ पारित करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.
मोर्चाचे नेतृत्व रविकांत तुपकर व किरण ठाकरे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले. स्थानिक बजाज चौकातून निघालेला मोर्चा डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात पोहोचला. याठिकाणी सभा घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. या मोर्चात प्रवीण कात्रे, अॅड. मंगेश घुंगरूड, समीर सारजे, सागर दुधाने, लोमहर्ष बाळबुधे, मनोज नागपुरे, संदीप दिघीकर, गौतम पोपटकर, गोपाल चोपडे, स्वप्नील मदनकर, वैभव नगराळे, यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी होते.