seat allocation bihar ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. 30 सप्टेंबरला बिहारमधील अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग बिहारचा दौरा करून निवडणुकीच्या कार्यक्रमाला अंतिम रूप देईल आणि 5 ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. बिहार विधानसभेची मुदत 23 नोव्हेंबरला संपत आहे, त्यामुळे 23 नोव्हेंबरपर्यंत राज्यात नवीन विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणूक होईल आणि 15 नोव्हेंबरपर्यंत या निवडणुकीचा निकाल लागेल, असा अंदाज आहे.
बिहार विधानसभेची निवडणूक भाजपाच्या नेतृत्वातील रालोआ आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी यांच्यात होणार आहे. दोन्ही आघाड्यांतील जागावाटप अद्याप जाहीर झाले नाही. येत्या काही दिवसांत त्याला अंतिम रूप दिले जाईल. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत; मात्र या दोन्ही पक्षांना बिहार विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मदत घ्यावी लागते. जनता दल संयुक्त (जदयू) हा भाजपाचा मुख्य मित्रपक्ष तर राष्ट्रीय जनता दल (राजद) हा काँग्रेसचा. भाजपाला जदयूसमोर आतापर्यंत बिहारच्या राजकारणात दुय्यम भूमिका घ्यावी लागत होती तर काँग्रेसला राजदसमोर. मात्र राज्यात भाजपाची स्थिती काँग्रेसच्या तुलनेत कितीतरी पटीने चांगली म्हटली पाहिजे. कारण राज्यात भाजपाला जदयूच्या तुलनेत नेहमीच सन्मानजनक जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला तर आतापर्यंत बिहारमध्ये राजदने टाकलेल्या जागावाटपाच्या तुकड्यांवर समाधान मानावे लागत होते.
जगन्नाथ मिश्र हे राज्यातील काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री होते. मार्च 1990 नंतर राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला नाही. म्हणजे 35 वर्षांपासून राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार आले नाही. जगन्नाथ मिश्र यांच्यावर चारा घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये भाजपा गेल्या अनेक वर्षांपासून सहभागी असला, तरी राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री आतापर्यंत झाला नाही. भाजपाला नेहमी उपमुख्यमंत्रिपदावरच समाधान मानावे लागले. यावेळची निवडणूक भाजपा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात लढवत असला, तरी निवडणुकीनंतर राज्यात कोणताही राजकीय चमत्कार होऊ शकतो. यावेळी राज्यात प्रथमच भाजपाचा मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतो. पण हे सर्व जदयू आणि भाजपा या दोन राजकीय पक्षांत कोणाला जास्त जागा मिळतील, त्यावर अवलंबून राहणार आहे. जदयूपेक्षा जास्त जागा जिंकल्या तर भाजपा मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एवढी वर्षे सत्तेत राहिल्यानंतरही बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री आतापर्यंत होऊ शकला नाही, याचे शल्य भाजपाला बोचते आहे.
भाजपाला राज्यात ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता असताना काँग्रेसवर मात्र राजदच्या आश्रितासारखे जगण्याची वेळ आली आहे. बिहारमधील विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत काँग्रेस कार्य समितीची बहुचर्चित बैठक बुधवारी पाटण्यात झाली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मागील महिन्यात बिहारमध्ये मताधिकार यात्राही काढली. या यात्रेला राज्यात बèयापैकी प्रतिसाद मिळाला असला, तरी राज्यातील काँग्रेसच्या स्थितीत सुधारणा होण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही.
2020 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची कामगिरी निराशाजनक होती. त्यावेळची निवडणूक काँग्रेसने राजदसोबतच लढवली होती.seat allocation bihar काँग्रेसने राज्यात 70 जागा लढवत फक्त 19 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसचा स्ट्राईक रेट 27 टक्के होता. राजदने 144 जागा लढवत 75 जागा जिंकल्या होत्या. राजदचा स्ट्राईक रेट जवळपास 52 टक्के होता. भाकपा मालेने 19 जागा लढवत 12 जागा जिंकल्या होत्या. त्यांचा स्ट्राईक रेट सर्वाधिक म्हणजे 63 टक्के होता. भाकपाने सहा तर माकपाने चार जागा लढवल्या होत्या. माकपने 50 टक्के स्ट्राईक रेटने 2 जागा जिंकल्या तर भाकपाने 33 टक्के स्ट्राईक रेटने 2 जागा पटकावल्या. म्हणजे सर्वांत कमी स्ट्राईक रेट काँग्रेसचाच होता.
243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 222 जागांची आवश्यकता होती. मात्र राजद आघाडीला 110 जागा जिंकता आल्या, म्हणजे बहुमतासाठी 12 जागा कमी पडल्या. काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे जागा न जिंकल्यामुळे राज्यात राजद आघाडी सत्तेवर येऊ शकली नाही, असा ठपका काँग्रेसवर तेव्हा ठेवण्यात आला होता. त्यामुळे यावेळी काँग्रेस सावधगिरीने पावले टाकत आहे. यावेळी काँग्रेसचा आग्रह जागांच्या संख्येसाठी नाही तर अशा जागा आम्हाला मिळाव्या, जिथे विजयाची शक्यता जास्त आहे, यासाठी आहे. 2020 मध्ये काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या आणि 8 मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांचा 5 हजारांपेक्षा कमी मताधिक्याने पराभव झाला होता. म्हणजे या मतदारसंघात काँग्रेस दुसèया स्थानावर होती. त्यामुळे काँग्रेसची सर्वाधिक आशा या 27 मतदारसंघांवर आहे. विशेष म्हणजे 2015 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत राज्यात राजदच्या 5 तर काँग्रेसच्या 8 जागा कमी झाल्या. 2015 मध्ये राजदने 80 तर काँग्रेसने 27 जागा जिंकल्या होत्या.
जागावाटपात आमच्या काही जागा कमी झाल्या तरी चालतील, पण यावेळी आम्हाला विजयाची शक्यता असलेले मतदारसंघ मिळावेत, अशी काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. यासाठी काँग्रेस नेते राजदवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र राजद याबाबत फारसे अनुकूल दिसून येत नाही. कारण राज्यात राजदला काँग्रेसची तेवढी गरज नाही, जेवढी काँग्रेसला आपल्या राजकीय अस्तित्वासाठी राजदची गरज आहे.
राज्यातील इंडिया आघाडीत राजद आणि काँग्रेसशिवाय झारखंड मुक्ती मोर्चा, लोजपा पशुपतिकुमार पारस गट आणि व्हीआयपी पक्ष नव्याने सहभागी झाले आहे. भाकप, माकप आणि भाकपा माले हे पक्ष आहेतच. राजद काँग्रेसला त्यांच्या मागणीप्रमाणे मतदारसंघ बदलून देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे राजदने काही मतदारसंघ काँग्रेसला बदलून दिले तरी तिथे काँग्रेस कोणते दिवे लावणार, हा आणखी मोठा प्रश्न आहे. कारण देशातील अन्य राज्यांप्रमाणे बिहारमध्येही काँग्रेस अतिशय कमजोर आहे. बिहारमध्ये काँग्रेसकडे जनमानसात स्थान असलेले नेते नाहीत.seat allocation bihar काँग्रेस राजदवर आपला दबाव आणू शकेल का, या दबावाला बळी पडत राजद काँग्रेसला काही जागा बदलून देईल का आणि राजदने जागा बदलून दिल्या तरी काँग्रेस मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत आपल्या कामगिरीत सुधारणा करेल का, याचे उत्तर येत्या काही महिन्यात मिळणार आहे.
श्यामकांत जहागीरदार
9881717817