नव्या नागपुरच्या विस्तारात सर्व भूमीपुत्रांना समावून घेऊ

- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Chandrashekhar Bawankule : विकासाचा परिघ विस्तारत नागपूर शहर आता नव्या नागपूरच्या स्वरुपात आकारास येऊ घातले आहे. यासाठी लाडगाव, गोधनी रिठी या भागात विस्तारणार्‍या नव्या नागपूरबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. या भागातील शेतकरी हे गुमगाव येथे वास्तव्यास आहेत. हे महानगर साकारतांना ज्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी जाणार आहेत त्यांना कायद्याच्या कक्षेमध्ये अधिकाधिक योग्य मोबदला मिळावा यादृष्टीने प्रयत्नांची भूमिका नागपूर महानगर विकास प्राधिकरणाची आहे. यासंदर्भात जे शक्य असेल ते देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
 
 
 
hjh
 
 
नागपूर संदर्भात जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस लाडगाव, गोधनी रिठी येथील शेतकरी, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार कृपाल तुमाने, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मिणा, पोलीस उपायुक्त निकेतन कदम, सहआयुक्त सचिन पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविण महिरे, धनराज आष्टनकर, किशोर आष्टनकर, लोणारे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
 
आमचा नवीन नागपुरला विरोध नसून या विकासात आम्हालाही सहभागी व्हायचे आहे. या विकासासाठी ज्या जमिनी लागत आहेत त्यातील काही प्लॉट नियमाच्या चौकटीप्रमाणे आम्हालाही मिळावे. या विकासात आम्हाला समावून घ्या, असे शेतकरी प्रतिनिधी किशोर आष्टनकर यांनी सांगितले.
 
 
नव्या नागपुरसाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत शेतकर्‍यांची एक प्रातिनिधीक पाच सदस्यांची समिती तयार करावी. या समितीशी नागपूर विकास प्राधिकरण, नागपूर सुधार प्रन्यास व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी ही समिती चर्चा करेल. शासनाची भूमिका ही नियमांच्या तरतूदीनुसार जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करेल, असे या सांगण्यात आले.
 
एकही प्लॉट विना रजिस्ट्री राहणार नाही
 
 
नागपूर सुधार अंतर्गत अनेक भागात गुंठेवारी पध्दतीने घेतलेल्या जागेवर लोक अनेक वर्षापासून वास्तव्य करीत आहेत. काही गुंठेवारीतील भूखंड आरक्षणामुळे बाधीत झालेले आहेत. गुंठेवारी अंतर्गत असलेल्या अभिन्यासात नगर भूमापन विभागाने मोजणी केल्यानंतर त्याच्या नियमितीकरणाची कार्यवाही सुरु होते. सदर कार्यवाहीत असणार्‍या अडचणी लागणारा विलंब लक्षात घेऊन मानीव नियमितीकरण बाबत लवकरच शासन धोरण निश्चित असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यात आवश्यक ती कार्यपध्दती निश्चित केली जात असून गुंठेवारीत असलेल्या सर्वांना याचा दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
 
 
नागपूर महानगराचा विचार करता गुंठेवारीच्या मोजणीचे अधिकार नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर विकास प्राधिकरणाला देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत आयुक्तांना तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. मोजणीसाठी जे लागणारे मनुष्यबळ आहे ते निवृत्त झालेले मोजणी अधिकारी, या क्षेत्रातील अनुभवी लोकांचे पॅनल करुन नियमानुसार याला गती देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे त्यांनी बैठकीत सांगितले. नागपूर सुधार संदर्भात विविध विकास कामासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे बैठक या बैठकीस खासदार श्यामकुमार बर्वे, विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रविण दटके व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.