राजस्थान
Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील बांसवाडा येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास केला. यावेळी झालेल्या भव्य जनसभेत त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या कार्यप्रणालीवर भाष्य करत विरोधकांवर टीकास्त्र सोडले. स्वच्छ ऊर्जा, वीज उत्पादन, शिक्षण व्यवस्था, कायदा-सुव्यवस्था व स्वदेशी अभियान यावर त्यांनी ठळकपणे आपली भूमिका मांडली.
"राजस्थानच्या मातीतून आज ऊर्जा क्षेत्रात भारताच्या सामर्थ्याचा नवा अध्याय लिहिला जात आहे. २१व्या शतकात वेगाने विकास साधण्यासाठी वीजेची उपलब्धता अत्यंत आवश्यक आहे," असे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "देश आज विजेच्या गतीने पुढे जात आहे. प्रत्येक राज्याला प्राधान्य देत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात आम्ही जनआंदोलन उभं केलं आहे."ते पुढे म्हणाले की, २०१४ पूर्वी देशात विजेचा गंभीर अभाव होता. "काँग्रेसच्या काळात वीज नसल्यामुळे अनेक भाग तासन्तास अंधारात राहत होते. जेव्हा २०१४ मध्ये देशवासीयांनी मला सेवा करण्याची संधी दिली, तेव्हा सुमारे २.५ कोटी घरांना वीजच नव्हती. हे चित्र बदलण्याचा आम्ही निर्धार केला आणि प्रत्येक गावापर्यंत वीज पोहोचवली," असे त्यांनी सांगितले.
नवीन चालना मिळाली
वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे जीवन सुलभ झाले असून लघुउद्योग व स्वरोजगारास चालना मिळाली, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत काँग्रेसवर आरोप करत म्हटले की, “काँग्रेसने वीजेच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष केले. राजस्थानला पेपर लीक घोटाळ्याचं केंद्र बनवलं. जल जीवन मिशनही त्यांनी भ्रष्टाचाराच्या खाईत ढकललं. महिलांवरील अत्याचार, बलात्कार्यांना संरक्षण, बेकायदेशीर दारू धंदा आणि गुन्हेगारीला त्यांनी प्रोत्साहन दिलं.”मोदी यांनी डूंगरपूर, प्रतापगड, बांसवाडा सारख्या भागांतील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवरही भाष्य करत सांगितले की, “भाजप सरकारने सत्तेत येताच या समस्यांवर कठोर कारवाई केली. कायदा-सुव्यवस्था बळकट केली आणि विकास प्रकल्पांना गती दिली.”यानंतर पंतप्रधान मोदींनी देशात लागू करण्यात आलेल्या वस्तू व सेवा कर (GST) या आर्थिक सुधारणेचाही उल्लेख केला. "आज संपूर्ण देश GST उत्सव साजरा करत आहे. २०१७ मध्ये GST लागू करून आम्ही कर आणि टोल याच्या गुंतागुंतीपासून देशवासीयांची सुटका केली. यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या आहेत," असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अभियान आणि स्वदेशीच्या आग्रहावरही भर दिला. “आपल्याला कोणत्याही क्षेत्रात इतरांवर अवलंबून राहायचं नाही. यासाठी स्वदेशीचा मंत्र महत्त्वाचा आहे. आपण अशीच उत्पादने खरेदी करावी ज्यात आपल्या मातीतली सुगंध असेल,” असं ते म्हणाले.
बांसवाडा येथे झालेला हा कार्यक्रम केवळ विकास प्रकल्पांच्या उद्घाटनापुरता मर्यादित न राहता, तो केंद्र सरकारच्या ध्येयधोरणांची पुनःप्रस्तुती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.