वर्धा,
Pankaj Bhoyar : आयटीआय टेकडीचा परिसर विस्तीर्ण असून बोलके ऑसिजन पार्कची निर्मिती याठिकाणी करण्यात आली आहे. पार्कला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निसर्गरम्य पार्क परिसराचा विविधांगी विकास करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
आज गुरुवार २५ रोजी सकाळी ऑसिजन पार्कला भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, मुख्याधिकारी विजय देशमुख, गटविकास अधिकारी समर्थ शिराळे, निसर्ग सेवा समितीचे संस्थापक मुरलीधर बेलखोडे, पतंजली योग पिठाचे दामोधर राऊत, आधारवड ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रा. शेख हाशम, निलेश किटे आदी उपस्थित होते.
ऑसिजन पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नागरिक निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येतात. त्यांना सोईसुविधा निर्माण करुन देण्यासाठी येथे लवकरच विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित संग्रहालय, ऊर्जा, क्रीडा सुविधा, मुतांगण तयार करण्यात येणार आहे. यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच नागरिकांना या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज आयटीआय टेकडी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात ना. भोयर यांनी सहभाग घेऊन परिसरातील स्वच्छता अभियान राबविले.
तालुका क्रीडा संकुलाला भेट
५ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे लोकार्पण रविवार २८ रोजी करण्यात येणार आहे. येथे विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा संकुलाप्रमाणे येथेही सुविधा उपलब्ध होणार आहे. २०० मीटर धावनपथ, व्हॉलिबॉल मैदान, कबड्डी मैदान, खो-खो मैदान, रिटर्निंगहॉल, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी यासारख्या सुविधा निर्माण करुन देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला चालना मिळेल, असे ना. पंकज भोयर यांनी तालुका क्रीडा संकुलाला भेट दिल्यानंतर सांगितले.