अग्रलेख
rain outbreak यंदाचा, 2025 चा पावसाळा नेहमीपेक्षा वेगळा अनुभव देतो आहे. यावेळी तो नेहमीपेक्षा जरा लवकरच आला. बऱ्याच शेतकऱ्यां ची पेरणीपूर्व मशागतसुद्धा व्हायची होती. तरीही पाऊस आल्याचा आनंद मोठाच असतो. शेतकऱ्यांसाठी तर असतोच, पण उन्हाळ्याची काहिली दूर होत असल्यामुळे सर्वसामान्य जनमानसही सुखावतेच. शेतकऱ्यांनी पाऊस आल्यामुळे सारी उठापटक, आवश्यक मशागत करून पेरण्या आटोपून घेतल्या. कोंबेही जमिनीबाहेर डोकावली. लवकर आलेल्या पावसाने लगेचच विश्रांतीसुद्धा घेतली. शेतकरी पुन्हा धास्तावले. दहशतच असते वरुणराजाची..! दुबार पेरणी करावी लागते की काय असे वाटू लागले, पण अपवाद वगळता बहुतांश पेरण्या साधून गेल्या. शेतकरी सुखावला. मग पुन्हा पाऊस सुरू झाला तो थांबेचना. नाही थांबला तर पीक पिवळे पडण्याची भीती वाटू लागली. पण पुन्हा थांबून पावसाने शेतीला उचलले. शेतकरी सुखावला. खूप वर्षांनी शेतीला पावसाची उत्तम साथ आहे असे बोलूही लागला.
खरोखरच शेतेे डोलताना दिसू लागली आणि पावसाचा पुन्हा मूड बदलला. बरी उभारी आलेल्या शेतात डवरण, निंदण, फवारणी पावसाने रोखून धरली, थांबता थांबेचना. सप्टेंबरमध्ये सहसा न येणारा पाऊस अर्धा महिना उलटून गेल्यानंतर थांबतच नाही आहे. परतीचा पाऊस म्हणावे तर तसेही नाही. थांबलाच नाही तर परतीचाही म्हणता येत नाही. जो येतो आहे तो थोडकाही नाही. भर पावसाळ्यासारखाच संततधार, मुसळधार, धुवांधार, कोसळधार, ढगफुटीसारखा हे सारे पाऊसझडीचे प्रकार सप्टेंबरमध्येही महाराष्ट्र अनुभवतो आहे. शहरी भागातही काही वेगळे नाही. सर्वदूर नाल्या, नाले, नद्या, धरणे सारे काही इतके ओसंडून वाहत आहे की ते जास्तीचे पाणी शेते, मैदाने, रस्ते, घरे आणि जंगलांमध्येही जाऊन मुक्काम ठोकत आहे. शेतीची तर पार वाट लागली आहे. फवारणीच नाही, झालीच तर लगेच पावसाने धुऊन टाकले असेच होत राहिले. मजबूतपणे जमिनीत पाय रोवून उभी झालेली पिके आता अळी, कीड, रोग यांच्या हल्ल्यांमुळे देशोधडीलाच लागली आहेत. असे व्हायला नको असे कितीही वाटत असले तरी विशेषत: अल्पभूधारक शेतकरी पुरता वैतागला असून त्याच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागले असणार, हे उघड आहे.
यावर्षी महाराष्ट्रात पावसाळा नेहमीपेक्षा खूप लांबला आहे. साधारणत: जुलै-ऑगस्टनंतर कमी होणारा पाऊस, यंदा सप्टेंबर महिन्यातही मुसळधार रूप घेऊन शेतकऱ्यांच्या आयुष्यावर घाव घालतो आहे. हवामान खात्याने वेळोवेळी इशारे दिले, तरीही या अनियमित पावसामुळे शेतीची होणारी दुरवस्था कोणी थांबवू शकलेले नाही.rain outbreak काही दिवसांपूर्वी सुस्थितीत असलेली पिके वाचण्याची शेवटची आशा असताना निसर्गाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे आणि आजही देतच आहे. भारतीय शेती अजूनही मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. सिंचनाच्या सोयी वाढल्या तरीही खरीप हंगाम 70 टक्के पावसाचाच असतो. अशा स्थितीत सप्टेंबरमध्ये आलेल्या अनावश्यक व अवकाळी पावसामुळे (परतीच्या नव्हे..) शेतीत प्रचंड नुकसान झाले. तूर, सोयाबीन, उडीद, मूग, धान, कापूस, मका अशा पिकांची काढणी सुरू झाली असतानाच्या काळातील या पावसामुळे सर्वत्र ऐसीतैसी झाली आहे. विदर्भातील सोयाबीन व कापूस ही मुख्य पिके सप्टेंबरमधील सततच्या पावसामुळे अक्षरश: मातीत गेली आहेत. सोयाबीनच्या शेंगा कुजल्या, कापसावर रोग आले. मराठवाड्यात मूग, उडीद, ज्वारी, तूर या पिकांची मोठी हानी झाली. खरिपातील ही पिके म्हणजे शेती कर्जफेडीचा आधार होता. पश्चिम महाराष्ट्रात धान आणि ऊस या पिकांना थेट फटका बसला. उसाच्या शेतात पाणी साचल्याने उत्पादन घटणार आहे. कोकणात धान कापणीवेळी आलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले. भाताचे दाणे काळवंडले, उत्पन्न घटले. हवामान खात्यानुसार, सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा 20 ते 30 टक्के अधिक पाऊस बहुतांश जिल्ह्यांत झाला. हा ‘आगाऊ’ पाऊस शेतीला चांगलाच दणका देणारा ठरला आहे आणि आजही त्याची दहशत कायमच आहे.
महाराष्ट्र सरकारनुसार, सुमारे 30 लाख हेक्टर शेतीला पाऊसबाधा झाली आहे. हजारो कोटींच्या नुकसानाचा अंदाज आहे. पावसामुळे धान्य ओले होऊन सडले. साठवणूक सोयी नसल्याने नुकसान वाढले. मूग, उडीद, तूर या कडधान्य पिकांचे उत्पादन घटणार आणि परिणाम बाजारभावावर होईल. सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला आहे. कडधान्ये आणि तेलबियांच्या भावात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. कापूस उत्पादन घटल्यास निर्यातीवर परिणाम होईल. या नुकसानामुळे केवळ शेतकऱ्यांनाच नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठाच फटका बसणार आहे.
महाराष्ट्रातील, प्रामुख्याने विदर्भातील शेतकरी आत्महत्या हा जुना आणि गंभीर प्रश्न आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पिके नष्ट झाल्याने नैराश्य येते. यावर्षीचे नुकसान पाहता नैराश्य आणि त्यातून अगतिकता वाढण्याची भीती आहे. महाराष्ट्रात दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करतात. सरकारी आकडेवारीनुसार, 2022 मध्ये 11 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 2023-24 मध्येही विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आत्महत्यांची मालिका सुरूच होती. आत्महत्येचे मुख्य कारण म्हणजे कर्जबाजारीपणा, पिकांचे नुकसान आणि शेतमालाला योग्य भाव न मिळणे, उत्पादन खर्चही न निघणे ही आहेत. शेतीमुळे आलेला आर्थिक ताण, पीककर्ज आणि खाजगी लुटारू व्याजदराचे कर्ज ही कारणे आहेतच. काही वर्षांपासून अपेक्षेनुसार पीकविमा न मिळणे याही कारणाची त्यात भर पडली आहे. पीकविमा मिळण्यातील विलंब व तुटपुंजी भरपाई, कागदपत्रांची किचकट प्रक्रिया, मातीत खपणे असूनही कोणत्यातरी कारणामुळे ‘हाती काहीही न लागणे’ किंवा ‘काहीतरीच हाती लागणे’ ही कारणे आहेतच. शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र सरकारनेही काहीतरी ठोस करण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारची तीच प्राथमिकता हवी आहे. कर्ज, खूप सारी देणी पण आहेत. अब्जो रुपयांची विकासकामे करायची आहेत. पण आज पावसाच्या या उद्रेकावर प्राधान्याने, विशेषतः शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. येथील शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे त्याच्या लहरीपणाचा दणका त्यांना बसतोच बसतो.rain outbreak यंदाच्या पाऊस पृष्ठभूमीवर सरकारने आपले सारे अनावश्यक खर्च थांबवण्याची गरज आहे. येत्या उरलेल्या आर्थिक वर्षात निदान कोणत्याही नवीन प्रकल्पावर तरी काहीही खर्च किंवा तरतूदही करणे टाळायलाच हवे आहे. जे काम सहा महिने लांबले तरी काही बिघडत नाही. शेतकऱ्यांना प्राधान्य द्यायचे तर सर्व अनावश्यक कामे रोखून धरण्याची गरज आहे. आपला पोशिंदा शेतकरी काही फारसा सुस्थितीत नाही याची जाणीव ठेवून यंदाच्या मान्सूनपासून सुरू झालेला आणि आजही सुरू असलेला पावसाचा धिंगाणा लक्षात घेऊन ठोस असे काहीतरी आता सरकारला करायलाच हवे आहे. तिकडे काहीही होवो, पण यावेळी सारे शेतकरी सरकारकडे डोळे लावून बसले आहेत हे लक्षात ठेवायलाच हवे आहे आणि त्याला भरघोस दिलासा द्यायलाच हवा आहे.
आज सप्टेंबरच्या 24 तारखेनंतरही पाऊस कधी नव्हे ती धूम, नव्हे उधम करतच आहे. गडचिरोलीपासून थेट कोकण, महाराष्ट्रात पावसाने कोणताही कोपरा न सोडता सर्वदूर लोकांच्या, विशेषतः शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणलेलेच आहे. या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र सरकार पाऊसग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपये जाहीर केले आहेत. यापैकी 1829 कोटी रुपये जिल्हास्तरावर पोचलेही आहेत. त्यासाठी निकषांमध्ये शिथिलता आणून घरे, शेती, जनावरे संदर्भात मदत केली जाणार आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रात आजही पाऊस करत असलेला विध्वंस लक्षात घेता 2215 कोटी रुपयांनी थोडा फारच दिलासा काय तो मिळणार आहे. ही मदत तोकडीच असून राज्याला केंद्राच्या मदतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी भरीव मदत होईल असे काहीतरी करावेच लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवू, पण राज्यही कमी पडणार नाही, असे सांगून त्यांची जाणीव व्यक्त केली आहे. हे नक्कीच आशादायक आहे. ही जाणीव कृतीत लवकर उतरो; कारण दिवाळीचा सण पुढ्यात आहे!