मुंबई,
World Pharmacist Day 2025 आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती असो किंवा दैनंदिन आरोग्य समस्यांचा सामना, आपल्या आजारपणाच्या प्रत्येक टप्प्यावर एक नाव आपल्यासाठी सतत कार्यरत असते – ते म्हणजे फार्मासिस्ट. त्यांच्या अविरत सेवा आणि रुग्णकल्याणासाठीच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा केला जातो. या वर्षीही हा दिवस ‘आरोग्यसेवेतील अनाम नायक’ या भावनेने साजरा होणार आहे.
खोकला, सर्दी, सौम्य ताप किंवा किरकोळ इजा – या सगळ्यासाठी डॉक्टरांऐवजी बहुतेकदा आपण आपल्या जवळच्या फार्मासिस्टचा सल्ला घेतो. अनेक वेळा त्यांच्याच मार्गदर्शनामुळे उपचारांची दिशा मिळते. फार्मासिस्ट फक्त औषध देणारे कर्मचारी नाहीत, तर ते औषधांच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन करणारे, औषधसाठ्याची शाश्वतता राखणारे आणि रुग्णांच्या सुरक्षिततेचे पहारेकरी आहेत.
जागतिक फार्मासिस्ट दिनाची सुरुवात
जागतिक स्तरावर फार्मासिस्टच्या भूमिकेची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस प्रथमच २००९ मध्ये साजरा करण्यात आला. फेडरेशन इंटरनॅशनल फार्मास्युटिकल्स (FIP) या जागतिक औषध संघटनेने या उपक्रमाची सुरुवात केली. विशेष म्हणजे, याच दिवशी १९१२ मध्ये FIP ची स्थापना झाली होती. हीच महत्त्वपूर्ण तारीख लक्षात घेऊन जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून २५ सप्टेंबरची निवड करण्यात आली.FIP च्या तुर्कीतील सदस्यांनी हा प्रस्ताव मांडला आणि नंतर जगभरातील फार्मासिस्ट समुदायाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला. आज हा दिवस जगभरातील शेकडो देशांमध्ये फार्मासिस्टच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.रुग्णालयांपासून ते ग्रामीण आरोग्य केंद्रांपर्यंत, फार्मासिस्ट आरोग्य व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत. औषधांची सुरक्षितता, गुणवत्ता आणि वेळेवर उपलब्धता यासाठी त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगासारख्या दीर्घकालीन आजारांमध्ये औषधांचे नियमित आणि योग्य प्रमाणात सेवन गरजेचे असते – यासाठी फार्मासिस्टच मार्गदर्शक ठरतात.तसेच, फार्मासिस्ट हे रुग्णांना औषधांचे संभाव्य दुष्परिणाम, अचूक डोस आणि औषधांच्या परस्परसंवादाबाबत जागरूक करत असतात. हे काम किती महत्त्वाचे आहे, हे कोविड-१९ सारख्या महामारीच्या काळात सर्वांनी अनुभवलं.
असे असले तरी, फार्मासिस्टची भूमिका ही अनेकदा सामान्य जनतेपासून शासनदरबारीही दुर्लक्षित राहिल्याचे चित्र आहे. विविध सर्वेक्षणांनुसार अजूनही फार्मासिस्टकडून मिळणाऱ्या व्यावसायिक सेवांबाबत पुरेशी जनजागृती नाही. त्यामुळे ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ हे केवळ एक औपचारिक उत्सव न राहता, जनजागृतीचा प्रभावी माध्यम बनावे, अशी अपेक्षा फार्मासिस्ट समुदायाकडून व्यक्त केली जात आहे.कालांतराने वैद्यकीय क्षेत्रात फार्मासिस्टची भूमिका केवळ औषध वितरणापुरती मर्यादित न राहता, ती रुग्णांच्या समग्र आरोग्य व्यवस्थापनात केंद्रस्थानी आली आहे. युरोप व अमेरिका यांसारख्या देशांमध्ये फार्मासिस्ट हे प्राथमिक आरोग्य सेवा देणाऱ्या पंक्तीत काम करताना दिसतात. भारतातही अशा प्रकारचा बदल अपेक्षित आहे.या दिवशी केवळ फार्मासिस्टच्या कार्याचा गौरवच नव्हे, तर त्यांच्या सेवाशर्ती, व्यावसायिक मान्यता आणि सक्षमीकरण याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सातत्याने होत आहे.
असंतोषाचा सूर
आरोग्य व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या औषधोपचार क्षेत्राला प्रत्यक्षात सक्षम बनवणाऱ्या फार्मासिस्टांच्या प्रश्नांकडे मात्र आजही शासन आणि समाजाचे दुर्लक्ष सुरूच आहे. जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील हजारो फार्मासिस्ट आपले प्रश्न, मागण्या आणि व्यथा पुन्हा एकदा अधोरेखित करत आहेत.राज्यात सध्या सुमारे ४.८ लाख परवाना प्राप्त फार्मासिस्ट कार्यरत असून, १.२० लाखांहून अधिक औषध दुकाने त्यांच्यावर आधारित आहेत. त्याचबरोबर जिल्हा, उपजिल्हा, तालुका रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील औषध वितरणाची संपूर्ण जबाबदारीही हेच फार्मासिस्ट पार पाडतात. मात्र, त्यांना ना पुरेशा सेवा अटी मिळतात, ना निश्चित वेतनमान. बहुतांश वेळा कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना ना पदोन्नतीची संधी मिळते, ना निवृत्तीवेळचा आर्थिक आधार.कोरोना काळात दिवसरात्र सेवा करूनही फार्मासिस्टांना ‘फ्रंटलाइन वॉरिअर’चा दर्जा न मिळाल्याने आजही असंतोषाचा सूर त्यांच्या मनात आहे. औषध वाटप, रुग्णांना समजावून सांगणे, दुष्परिणामांबाबत जागरूकता, तसेच औषधांची गुणवत्ता सुनिश्चित करणे यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडूनही फार्मासिस्टांना केवळ "औषध देणारे कर्मचारी" म्हणूनच ओळखले जाते, ही त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेची मोठी हानी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
राज्यात सध्या सुमारे १,००० फार्मसी महाविद्यालयांमधून दरवर्षी हजारो पदवीधर बाहेर पडत आहेत. मात्र, त्यांना आरोग्य यंत्रणेत समुपदेशन, औषध गुणवत्ता नियंत्रण किंवा उपचार मार्गदर्शन अशा महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये सामावून घेतले जात नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार फार्मासिस्ट केवळ औषध वितरण करणारे कर्मचारी नसून, रुग्णसेवेतील एक महत्त्वाचा दुवा आहेत. प्राचार्य मंजिरी घरत यांच्या मते, अनेक परदेशांत फार्मासिस्ट रक्तदाब, शुगर तपासतात, उपचारांबाबत मार्गदर्शन करतात. त्यांच्याशी तुलना करता, भारतात त्यांची भूमिका अत्यंत सीमित ठेवली गेली आहे.औषध साठा वेळेवर उपलब्ध न झाल्यास फार्मासिस्टच रुग्णांच्या रोषाचा पहिला बळी ठरतात. ‘आरोग्य सेतु’ अहवालानुसार २०२३-२४ मध्ये राज्यातील १२ टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक औषधसाठा वेळेवर मिळालाच नाही. जिल्हा रुग्णालयांमध्ये हे प्रमाण ८ टक्के होते. परिणामी, रुग्णांचा संताप औषध वितरण काउंटरवर काम करणाऱ्या फार्मासिस्टांवरच उतरतो.
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना
औषधांच्या गुणवत्तेचा मुद्दा देखील गंभीर आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या अहवालानुसार २०२३ मध्ये महाराष्ट्रातील ३.२ टक्के औषध नमुने ‘नॉन-स्टँडर्ड’ ठरले. अशा स्थितीत गुणवत्तायुक्त औषधे वेळेवर रुग्णांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पुन्हा फार्मासिस्टांवरच येते.या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘महा औषध उपलब्धता योजना’ सुरू केली असून, २०२४ मध्ये जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ५०० हून अधिक औषध वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ही योजना जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘राईट मेडिसिन, राईट टाइम, राईट डोस’ या तत्वांवर आधारित असून, औषध सेवेची शाश्वतता साधण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.फार्मासिस्ट संघटनांचे म्हणणे आहे की, “औषध उपचारांची परिणामकारकता वाढवण्यासाठी, गैर-संसर्गजन्य रोगांवर सातत्यपूर्ण उपचार देण्यासाठी, आणि रुग्णांचे प्रबोधन करण्यासाठी फार्मासिस्टांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, यासाठी त्यांना स्थिर सेवा अटी, योग्य वेतनमान, आणि व्यावसायिक सन्मान मिळालाच पाहिजे.”जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्ताने फार्मासिस्ट संघटनांकडून पुन्हा एकदा ही मागणी करण्यात आली आहे की, कंत्राटी पद्धती थांबवून, त्यांना नियमित सेवा मिळावी, औषध व्यवस्थापनात अधिक सक्रीय सहभाग द्यावा आणि त्यांच्या व्यावसायिक क्षमतेचा अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग करावा. शासनाकडून यावर ठोस निर्णय घेण्यात आला, तरच ‘राईट मेडिसिन, राईट टाइम, राईट डोस’ हे घोषवाक्य खऱ्या अर्थाने साकार होईल, असा विश्वास फार्मासिस्ट वर्ग व्यक्त करतो आहे.