अहेरी,
electricity problem मागील दोन महिन्यांपासून अहेरी राजनगरीत वारंवार होणार्या विजेच्या लपंडावामुळे आणि कमी विद्युत दाबामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. कमी विद्युत दाबामुळे मोटारी जळणे किंवा कमी दाबामुळे त्या बंद पडणे नित्याचेच झाले असून, यामुळे नागरिकांना कधी दोन-दोन दिवस नळाला पाणी येत नाही. त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी दूर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संदीप कोरेत आणि शिवसैनिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

विद्युत पुरवठ्यातील मोठ्या दोषांमुळे (फॉल्टमुळे) गेल्या तीन दिवसांपासून अहेरीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 21 तारखेला वारंवार लाईट ये-जा केल्यामुळे पाणी पुरवठा कार्यालयातील मोटार मशीन जळाल्या. कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे मशीन सुरू होत नसल्याने हे संकट अधिकच वाढले आहे. महावितरण विभागाला अद्यापही फॉल्ट मिळाला नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे देखील अहेरीत पाणी येणार नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर, जल ही जीवन है या ब्रीदवाक्याचे स्मरण करून राज नगरीतील वीज व जलसंकट लवकरात लवकर दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. वीजसंकट व जलसंकटाला जबाबदार असणार्या अधिकार्यांच्या तोंडाला नाईलाजास्तव गावातील महिलांना घेऊन काळे फासावे लागेल, अशी कठोर भूमिका घेण्यास भाग न पाडता समस्या सोडवावी, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी तालुका अध्यक्ष अक्षय करपे, आकाश पुपलवार, अक्षय कुमराम व अन्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदीप कोरेत यांनी घेतली दखल
पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांनी फोनद्वारे तक्रार केल्यानंतर संदीप कोरेत यांनी या गंभीर विषयाची तत्काळ दखल घेतली. जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून कमी व्होल्टेजमुळे मोटार चालू होत नसल्याची माहिती मिळताच, त्यांनी लगेच आलापल्ली येथील महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन दिले.