गोंदिया,
Gondia accident मुसळधार पावसामुळे धावत्या ऑटो रिक्शावर झाड कोलमडून पडल्याने ऑटोचालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जखमी झाल्याची घटना आज, शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरील गोरेगाव तालुक्यातील मुरदोली जंगल शिवारात वाघदेव देवस्थानाजवळ घडली. या घटनेमुळे सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती.
जिल्ह्यात कालपासून पावसाचा मुक्काम असून शुक्रवारी दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाची नोंद करण्यात आली. त्यातच दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गोंदिया - कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरील मुरदोली जंगल परिसरातील वाघदेव देवस्थानाशेजारी असलेला चिंचेचा झाड रस्त्याच्या मधोमध कोलमडून पडला. यावेळी महामार्गावरून जात असलेला ऑटो रिक्षा एमएच ३५ ए एच ०२३५ त्या झाडा खाली आल्याने ऑटोच्या समोरील भागाचे नुकसान झाले. या अपघातात चालकाच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला.
यावेळी ऑटोमध्ये दोन महिला प्रवासी असल्याची माहिती असून त्यांना कसल्याचे प्रकारची इजा झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी ऑटोचालकाला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जवळपास एक ते दिड तास ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. घटनेची माहिती गोरेगाव वन विभाग व पोलिस प्रशासनाला देण्यात आली. दरम्यान, वन विभागाच्या पथकाने व वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. बातमी लिहीपर्यंत जखमी चालकाचे नाव कळू शकले नाही. मात्र, सदर ऑटो रिक्शा गोंदिया येथील मंगल लिंगेकर यांचे नावे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
यंदाच्या पावसाळ्यातील चौथी घटना....
यंदाच्या पावसाळ्यात रस्त्याच्या कडेवरील झाड धावत्या वाहनांवर कोलमडून पडल्याची जिल्ह्यातील ही चौथी घटना असून यात तिरोडा तालुक्यात दोन घटनांमध्ये एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाले होते. तर सडक अर्जुनी शहरात धावत्या कारवर झाड पडल्याने दोघांचा मृत्यू व तिघे जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यात आजची घटना पुढे आली असून रस्त्याच्या कडेवरील झाड वाटसरूंसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे दिसून येत आहे.