मोठे यश! दहा जहाल नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण

झारखंड सरकारच्या पुनर्वसन धोरणाला यश

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
झारखंड,
Jharkhand Naxal surrender, झारखंडमधील चाईबासा येथे नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या सुरक्षा दलांच्या कारवायांना मोठे यश मिळाले आहे. सीपीआय (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेचे नऊ जहाल नक्षलवादी आणि एक क्षेत्र समिती सदस्य यांनी आज अधिकृतपणे आत्मसमर्पण करत शस्त्र खाली ठेवले. झारखंड पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक आत्मसमर्पण कार्यक्रमात हे नक्षलवादी मुख्य प्रवाहात सहभागी झाले.
 
Jharkhand Naxal surrender,
 
 
हा कार्यक्रम झारखंड सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांतर्गत घेण्यात आला होता. झारखंडचे पोलिस महासंचालक (DGP) अनुराग गुप्ता, सीआरपीएफ आणि झारखंड जग्वारचे वरिष्ठ अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये क्षेत्र समिती सदस्य रांडो बोईपाई उर्फ क्रांती बोईपाई, गरडी कोडा, जॉन उर्फ जोहान पूर्ती, निरसो सिदू उर्फ आशा, घोनोर देवगम, गोमेया कोडा उर्फ टार्झन, कैरा कोडा, कारी कायम उर्फ गुलांची, सोवित्री गोप उर्फ मुतुरी उर्फ फुटबॉल आणि प्रदीप सिंग मुंडा यांचा समावेश आहे.
 
 
चाईबासा Jharkhand Naxal surrender,  परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवादी हालचाली सक्रिय असून, कोल्हान आणि सारंडा या जंगलपट्ट्यात सीपीआय (माओवादी) संघटनेचे पूर्व प्रादेशिक पथक प्रभावीपणे कार्यरत होते. या भागात केंद्रीय समितीचे सदस्य मिसिर बेसरा, पतिराम मांझी उर्फ अनल, असीम मंडल, सुशांत उर्फ अनमोल, मेहनात उर्फ मोचू, अजय महातो उर्फ बुधराम, पिंटू लोहारा, अश्विन, अमित मुंडा, सलुका कायम आणि सागेन अंगारिया हे सक्रिय असून, त्यांच्याविरोधात सुरक्षा दलांकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत.झारखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत चाईबासा परिसरात एकूण ९,६३१ कारवाया करण्यात आल्या असून, या मोहिमांमध्ये १७५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, चकमकींमध्ये १० नक्षलवादी ठार झाले असून मोठ्या प्रमाणात स्फोटके, शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आले आहेत. या कालावधीत चाईबासामध्ये २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची नोंद आहे.
 
 
या आत्मसमर्पणामुळे चाईबासासह आसपासच्या भागातील नक्षलवादी कारवायांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. झारखंड पोलिसांनी इतर नक्षलवाद्यांनाही झारखंड सरकारच्या प्रत्यार्पण आणि पुनर्वसन धोरणाचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले आहे.हा आत्मसमर्पण कार्यक्रम हे झारखंड सरकारच्या धोरणांच्या यशस्वी अंमलबजावणीचे प्रतिक मानले जात असून, नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या पुनरुत्थानासाठी पावले उचलण्याची ही सुरुवात असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.