मुंबई
prisoners attack police कल्याण न्यायालयाच्या परिसरात मंगळवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडवली आहे. न्यायालयात हजर करून परत नेले जात असताना चार कैद्यांनी पोलिसावर अचानक हल्ला केला. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, या चार आरोपींविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, prisoners attack police मंगळवारी दुपारी आठ आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांकडून त्यांना पुन्हा आधारवाडी कारागृहात नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, पोलीस व्हॅनमध्ये जागेची कमतरता असल्याने पोलीस नाईक किशोर पेटारे यांनी काही आरोपींना पाठीमागच्या सीटवर बसण्यास सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या चार आरोपींनी पेटारे यांच्यावर अचानक हल्ला चढवला.हल्ला करणाऱ्यांमध्ये आकाश वाल्मीकी, गणेश उर्फ शालु मरोठीया, योगींदर उर्फ भोलु धरमवीर मरोठीया आणि विवेक शंकर यादव यांचा समावेश असून, या चौघांनी पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडत धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ करत मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही क्षण कोर्ट परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
या घटनेमुळे पोलिस दलात संतापाची भावना व्यक्त होत असून, संबंधित आरोपींविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात सरकारी कर्मचाऱ्यावर जबाबदारी पार पाडताना हल्ला केल्याचा आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, जखमी पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, घटनास्थळी उपस्थित इतर पोलिसांचे जबाब नोंदवले जात आहेत.
न्यायालयाच्या परिसरातच अशा प्रकारचा हल्ला घडल्याने सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापुढे आरोपींना न्यायालयात आणताना अधिक दक्षता घेतली जाणार असल्याचे सूत्रांकडून कळते.