निमित्त : दोन सुखद धक्क्यांचे

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
लोकायन
सुधीर पाठक
Lokyan पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या काही दिवसात केलेल्या दोन कृती चर्चेचा विषय ठरल्या आजकालच्या रुढ शब्दावलीत त्याला ‘मास्टर स्ट्रोक’ असे विशेषण लावता येईल, पण आजकाल ते विशेषणही मोदीजींच्या काळात घासून गुळगुळीत झाले आहे. त्याऐवजी नवीन शब्दावली वापरता येईल काय, याचा विचार करावा लागेल. मात्र, भारतीय राजकारणावर दीर्घकालीन प्रभाव टाकणार्‍या घटना म्हणून त्या दोन्ही घटनांकडे बघावे लागेल.
 
 
modi
 
पंतप्रधान मोदी यांनी आपली कार्यशैली निश्चित आहे. ते पत्रपरिषद कधीही घेत नाही तर जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांनी सभा घेणे किंवा रोड शो करणे वगैरे माध्यमे निश्चित केली आहेत. ‘मन की बात’ या त्यांच्या उपक्रमाने तर नवीनच विक्रम केला आहे. यामुळे आकाशवाणीचेही प्रभाव क्षेत्र वाढले आहे. एवढ्यातच ते स्वतःच्या नावाने वृत्तपत्रात लेखनही करू लागलेत. आसामचे ख्यातकीर्त भारतरत्न भूपेन हजारिका यांच्यावर त्यांनी लेख लिहून त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्या पाठोपाठ त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्यावर लेख लिहून ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभीष्टचिंतन केले. हा लेख भारतातील जवळजवळ सर्वच वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाला. त्यावर खूप उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
 
 
संघ स्वयंसेवक, प्रचारक यांच्या वाढदिवसाला फारसे महत्त्व नसते. स्वतः मोदीजी कुठे स्वतःचा वाढदिवस साजरा करतात. आता काही दिवसांपूर्वी म्हणजे १७ सप्टेंबरला त्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. हा वाढदिवस असो किंवा विविध सण असोत, मोदीजी कधी सीमावर्ती भागात सैनिकांसह राहतात तर कधी सुदूर भागातील आदिवासींसोबत आपला सण साजरा करतात. ही पद्धतीदेखील त्यांनी संघ संघ प्रचारक यांच्याप्रमाणेच अंगीकारली आहे; नव्हे ते संघ प्रचारक होते म्हणूनच त्या पद्धतीने वागतात. हे वागणे समाज रीती, पद्धतीपेक्षा भिन्न आहे म्हणून समाजाला त्याचे अप्रुप आहे.
 
 
डॉ. मोहनजी भागवत यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झालीत. तेही या Lokyan  पठडीतले अध्वर्यू. मागील वर्षी एका पारिवारिक कार्यक्रमात मोहनजी प्रमुख अतिथी होते. ज्याने ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे, त्याचेही त्यांनी कौतुक केले. पण त्या सर्व परिवाराला संघ अधिकार्‍यांची ताकीद होती की, मोहनजींचा वाढदिवस काल ११ तारखेला झाला. त्यांनी ७५ व्या वर्षांत प्रवेश केला आहे वगैरे याचा उल्लेख कुठेही होऊ नये. आशीर्वचन वगैरे कुठलाही भाग नको. पण यावर्षी मात्र ७५ व्या वाढदिवसाच्या ते श्री श्री रविशंकर यांच्यासोबत एका कार्यक्रमात होते. त्यात त्यांच्या वाढदिवसाचा उल्लेख करत त्यांचा सत्कार झाला, तर वाढदिवसाच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी लिहिलेला लेख सर्वत्र प्रसिद्ध झाला. दुसर्‍या दिवशी म्हणजे १२ तारखेला ब्रह्माकुमारीजच्या एका कार्यक्रमात ७५ दिव्यांनी ओवाळणे वगैरे असाही कार्यक्रम झाला. हे वर्ष तसे अपवादाचेच म्हटले पाहिजे. संघ सर्वजण इतके गुंतलेले असतात की, त्यांना वाढदिवस वगैरे याचे स्मरणच राहत नाही.
 
 
संघाने श्री गुरुजींचा ५१ वा वाढदिवस साजरा करून त्यांना जनतेतर्फे थैली देण्यात आली होती. श्री गुरुजींचा अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याला विरोध होता आणि थैली वगैरे हेही त्यांना मान्य नव्हते. पण संघाने आज्ञा देऊनच हा वाढदिवस साजरा घेतला होता, नव्हे त्यांच्यावर वाढदिवस लादला होता. संघावरील पहिल्या बंदीनंतर संघाची जी आर्थिक कोंडी झाली होती, त्यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून ही आज्ञा होती. हा एकमेव अपवाद. ज्यावेळी संघाने गुरुपूजनाव्यतिरिक्त अन्य मार्गाने निधी संकलन केले. आजकाल संघानेही आपल्या पद्धतीमध्ये बदल केला आहे. गुरुपूजनाच्या कार्यक्रमात जे लहानगे प्रपत्र भरून घेतले जाते, जन्मतारीख वगैरे विचारलेली असते आणि त्या स्वयंसेवकाकडे वाढदिवसाला जाऊन शाखेतील बाकी स्वयंसेवक त्याचे अभीष्टचिंतन करतात. एक समाजाभिमुख परिवर्तन म्हणून या बदलाकडे बघितले पाहिजे.
 
 
Lokyan मोहनजींच्या वाढदिवसाला काही वेगळा संदर्भही होता. नागपूरलाच मोरोपंत पिंगळे यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी जनतेला पंतांचा एक विनोदी किस्सा सांगितला आणि त्यावरून पत्रकारांनी पतंग उडविणे सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवृत्त व्हावे असा हा सल्ला आहे, असा शोध काहींनी लावला तर काहींनी वेगळा सवाल उपस्थित केला. स्वतः मोहनजी ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत म्हणजे ते निवृत्त होणार आहेत का? लगेच त्या दोघांचे उत्तराधिकारी कोण, याचाही शोध पत्रकारांनी घेणे सुरू केले. अखेर दिल्लीला संघपरिचय व्याख्यानमालेच्या तिसर्‍या जो प्रश्नोत्तराचा भाग झाला, त्यावेळी मोहनजींनी स्पष्ट केले, ‘ना मी स्वतः सरसंघचालक पदावरून निवृत्त होणार आहे, ना कोणी निवृत्त व्हावे असा सल्ला मी कोणाला दिला आहे.’ ते पुढे असेही म्हणाले, मला संघाने अमुक एका ठिकाणी शाखा लाव असे सांगितले तर मी तसेही करीन. त्या उत्तरावरून एक किस्सा आठवला. डॉ. भागवत सरसंघचालक झाले तो दिवस. त्या दिवशी सरसंघचालक सुदर्शनजी यांनी सर्व उपस्थित प्रतिनिधींना संबोधित केले. त्यांनी सांगितले, आता मला समोरच्या व्यक्तींची नावे आठवत नाहीत आणि त्यामुळे खूप अडचणीचे होते आहे. त्यामुळे आता मी थांबतो आहे आणि पुढील सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राहतील. त्या क्षणाला सुदर्शनजी हे मावळते सरसंघचालक झालेत ते व्यासपीठावरून सरळ प्रतिनिधींमध्ये येऊन बसलेत. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी काही पत्रकार महाल संघ कार्यालयात मोहनजींना भेटायला गेले होते, त्यावेळेला मोहिते शाखा लागली होती आणि सुदर्शनजी हे बालांचा गण घेत होते. त्यामुळे संघात एवढी सहजता ही स्वाभाविक आहे. त्यात नवीन काहीही नाही. पण हे सर्व संघात प्रत्यक्ष येऊन पाहिले तरच जर सांगीवांगीवरून आपण मते बनवू लागलो, तर बाकीच्यांना पडतात तसे प्रश्न पडू लागतात.
 
 
२०१४ मध्ये मोदीजी केंद्रात सत्तेत आले आणि त्यानंतर ते संघ कार्यालयात कधी आले नाहीत. यावर्षी माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमासाठी ते नागपूरला आले त्यावेळी रेशीमबाग स्मृतिभवनात गेले. डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रतिमेला आणि श्री गुरुजींच्या समाधिरूपी यज्ञकुंडाला त्यांनी पुष्पांजली केली आणि त्यानंतर माधव नेत्रालयाच्या प्रत्यक्ष कार्यक्रमात मोदीजी व मोहनजी दोघेही एका व्यासपीठावर होते. मोहनजी कार्यक्रम सुरू होण्याच्या आणि अर्थातच मोदीजी येण्याच्याही आधी व्यासपीठावर आपल्या जागेवर बसले होते. मोदीजी आल्यावर दोघेही जवळजवळ बसले आणि त्यांचे आपसात बोलणेही झाले. त्यावेळी बोलताना मोदीजींनी संघाला महान सांस्कृतिक वटवृक्षाची उपमाही दिली होती. त्याआधी श्री रामललाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली, त्यावेळी ही दोघे एकत्र दिसले होते. यावरून काय सुरू झाले की, मोदीजी आणि संघाने, मोदीजी आणि भाजपाने संघ परिवाराशी जुळवून घेतले आहे, अशा बातम्या सुरू झाल्या. या दोघांमध्ये आधी संघर्ष आहे अशा बातम्या वृत्तपत्रातून आणि वाहिन्यांवर आलेल्या होत्या. त्यामुळे समझोत्याच्या बातम्याशिवाय पर्याय नव्हता.
 
 
दोन - एक स्वयंसेवक संघटना तर दुसरी सरकारची संघटना यांच्या जाहीर संबंधात काही राजशिष्टाचार तर येतात. त्यामुळे तरी अन्य मार्गाने खाजगी संवाद असू शकतो. ज्याला राजनैयिक भाषेत ‘ट्रॅक टू डिप्लोमसी’ असे म्हणतात. पूर्वी पदावर नसताना, पदांचे दायित्व नसताना, त्याची बंधन नसताना जेवढ्या सहजपणाने दोघेही वावरत होते, तेवढे आता ते वागतील अपेक्षा चुकीची नाही का? मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत. ते संघ आणि संघ स्वयंसेवकांचेही पंतप्रधान आहेत, याचे भान संघ ठेवतो. म्हणूनच माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमात सर्वात शेवटचे भाषण पंतप्रधान मोदी यांचे झाले होते. संघाने राजकीय क्षेत्राचे रीतिरिवाज नेहमीच पाळले आहेत. मागे एका कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी होते. त्यावेळी भाषण नेहमी शेवटी असल्याची परिपाठी बाजूला सारून सरसंघचालक आधी बोलले होते आणि नंतर माजी राष्ट्रपती प्रणवदा मुखर्जी यांचे संबोधन झाले होते.
 
 
Lokyan पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत हे दोघेही समवयस्क आहे. साधारणपणे दोघांचेही संघ वय समान आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी हा लेख लिहून संघशरणता स्वीकारली, असा जावईशोध लावणे उभयतांवर अन्याय राहणार आहे. आपण एक लक्षात घेतले पाहिजे की, राजकारणातील व्यक्ती फक्त पुढील पाच वर्षांचा विचार करतो. भाजपाला आता २०२४ नंतर २०२९ चा विचार करायचा आहे. तर, संघ दीर्घकालीन विचार करत असतो आणि भविष्यात काय काय परिवर्तन होतील, याचा अंदाज घेत असतो. २०४७ मध्ये आपला देश कसा राहील हा संघाच्या विषय आहे.
 
 
पत्रकार व राजकीय पक्षांना या लेखाबद्दल काय वाटले यावर तर खूपच मते व्यक्त झाली आहेत आणि ती पुढेही होत राहतील; पण संघप्रेमी जनात काय भावना होत्या, हेही बघणे गमतीदार राहील... गरज होती का याची?
मोदीजींनी यातून काय साधले?
हा लेख लिहायचा निर्णय पंतप्रधानांनी स्वतः घेतला की त्यांना प्रचारकाने तो घ्यायला लावला.
बहुदा हा निर्णय पंतप्रधानांनी स्वतःच घेतला असावा. कुणीही त्यांना अशा प्रकारे लेख लिहिण्याची विनंती करणार नाही.
वाढदिवसाला शुभेच्छा देणे हे युगानुसार आहे.
आपल्या स्वयंसेवकावर घडलेले संस्कार असे आहेत की, मोठ्या पदावर पोहोचलेल्या स्वयंसेवकांनी एकमेकांची खाजगी कार्यक्रमात केलेली प्रशंसा आपल्याला भावते, ते किस्से आपण मन लावून आणि दुसर्‍यांनाही सांगतो. पण ही प्रशंसा लेखी आली की मात्र नाक मुरडतो.
 
 
त्यातही असा इतका मोठा लेख लिहिणे हे अगदीच प्राथमिक दर्जाचे आहे. दोन उच्चपदस्थ आणि त्यांच्यातील राजकीय संवाद हा अधिक चांगल्या पद्धतीने व्हायला हवा होता. असा लेख लिहिणे ही फारच ढोबळ पद्धत वाटते. जे म्हणावयाचे ते सांकेतिक पद्धतीने, झाले असते तर अधिक प्रभावी ठरले असते. असा लेख लिहिण्यातून आणि तो सर्वत्र छापून येण्यातून त्या लेखाची अपरिहार्यता आणि संबंधातील कृत्रिमता जास्त दिसते. हे सर्व बनावट आहे अशाही भावना व्यक्त झाल्यात.
खरं म्हणजे श्रेय विन्मुख राहण्याची संघ संस्था आणि सरसंघचालकांप्रती म्हणजे संघाप्रती श्रद्धा व समर्पण भाव असलेले स्वयंसेवक याचे सहज सुंदर उदाहरण आहे. असेच केशव कुलोत्पांन्नानी मनात ठसविले पाहिजे.
 

Lokyan  पंतप्रधानांचा या आठवड्यातील दुसरा करिष्मा म्हणजे मणिपूरला त्यांनी दिलेली भेट. त्यांची ही भेट त्या परिसराला नवीन आशा जागविणारी ठरणार आहे. २०२३ पासून मणिपूरमध्ये अतिशय तीव्र असंतोष आहे. मोठ्या प्रमाणात दंगली सुरू आहेत. कुकी आणि मैती यांच्यातील संघर्षात परस्परांची जाळणे, हत्या करणे वगैरे प्रकार सुरू आहेत. हा सगळा कालखंड अतिशय अस्थिरतेचा आणि सुरक्षेला मोठा धोका निर्माण करणार आहे. त्यामुळे मोदीजी त्या ठिकाणी गेले नाही. मोठ्या प्रमाणात हिंसाचार तिथे सुरू असूनही मोदीजी तिथे जाणे टाळतात, असे राजकीय आरोपही त्यांच्यावर करण्यात आले; पण परिस्थिती नियंत्रणात आली. शांत झाली त्यावेळेला पंतप्रधान मोदी हे चुराचांदपूरला विस्थापितांशी संवाद साधायला गेले. मणिपूरची राजधानी इम्फाल येथे पोहोचल्यावर तिथून ६०-७० किलोमीटर अंतरावर जाऊन सभेला संबोधित करणे, विस्थापितांशी संवाद साधणे हे कठीण होते. असुरक्षित होते. खरं म्हणजे ते विमानाने जाणार होते, पण वैमानिकाने पावसामुळे जाणे शक्य नाही, असे सांगितल्यावर हा कार्यक्रम रद्द करावा, असा निर्णय सरकारी घेतला गेला. पण मोदीजींनी त्याला चक्क नकार दिला. रस्ते मार्गाने जाण्याचा आपला निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यात धोका खूप होता, पण तरीही मोदींनी तो पत्करला व चुराचांदपूरला जाऊन विस्थापितांशी संवाद साधला. ७३०० कोटी रुपयांचे प्रकल्प त्यांनी या भागाला दिलेत. त्याचवेळी काँग्रेसने मात्र निदर्शने करून मोदींना टोमणे मारलेत. त्यात काँग्रेस मल्लिकार्जुन खडगे हे आघाडीवर होते. एक निश्चित की, मोदीजींनी एकाच आठवड्यात दोन धक्के जनतेला दिलेत. त्याचे काय परिणाम सामाजिक व राजकीय जीवनावर होतात, हे आपल्याला निकटच्या भविष्यात दिसेलच. आज तरी या दोन सुखद धक्क्यांबद्दल मोदीजींचे मनःपूर्वक अभिनंदन.
 
८८८८३९७७२७