नद्यांचे खोलीकरण, गाळ काढण्याचे काम प्राधान्याने करा: पालकमंत्री मकरंद पाटील

*जिल्हा नियोजन समितीची बैठक

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
बुलढाणा, 
Makarand Patil : जिल्ह्यात अवेळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे नद्यांची पाणी पातळी वाढून ते पाणी शेत शिवारात जावून शेतीचे नुकसान होत आहे. त्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियांनांतर्गत नद्यांतील गाळ काढणे आणि खोलीकरण करण्याचे काम प्राधान्याने करावे. इंधनासाठी निधी दिला जाईल. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकर्‍यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत अशा शेतकर्‍यांना शेतात गाळ टाकण्यासाठी प्रशासनाने प्रोत्साहित करावे, असे निर्देश पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दि. २६ सप्टेंबर रोजी दिले.
 
 
 
j
 
 
 
जिल्हा नियोजन समितीची बैठक ही जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. या बैठकीला सहपालकमंत्री ना. संजय सावकारे, आमदार चैनसुख संचेती, आ. संजय गायकवाड, आ. धीरज लिंगाडे, आ.सिद्धार्थ खरात, आ.मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते या बैठकीत पालकमंत्री ना. मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील कामांच्या निधी वाटप व खर्च, प्रशासकीय मान्यता, नवीन शाळा व दुरस्ती, पाऊसपाणी, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, नैसर्गिक आपत्ती मदत वाटप, अवकाळी पाऊस, वादळवारा, गारपीट, अतिवृष्टीमुळे बाधित शेतपिकांची माहिती, फळबाग लागवड, प्रधानमंत्री पीक विमा योजना आदी विषयांचा सविस्तर आढावा घेतला.
 
 
 
पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी आढावा घेतांना जिल्हा वार्षिक योजनेतील प्रस्तावित कामांच्या प्रशासकीय मान्यता सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण कराव्यात. तशा सूचना शासनाने जारी केल्या आहेत. तसेच आटोबर महिन्याअखेर कामांचे कार्यादेश देण्याचे काम पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी विभागांना दिल्या.ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील बर्‍याच भागात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांवर संकट आले आहे. त्यांना मदत करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्रशासनाने देखील तत्परतेने पंचनामे पूर्ण करावेत. तसेच जून ते अ‍ॅागस्ट या कालावधीत झालेल्या अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीची मदत मंजुर करण्यात आली आहे. या मदतीचे वाटप सुरु झाले आहे.
 
 
सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर करावेत. या आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना शेतपिकांची नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर त्यांच्या थेट बँक खात्यात वितरित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, तसेच खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई लवकरच देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री ना. जाधव यांनी यावेळी सांगितले.यावेळी सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील कामांची आढावा घेत प्रशासकीय मान्यता सप्टेंबरपर्यंत प्रदान कराव्यात. कामे सुचवितांना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.या बैठकीनंतर पालकमंत्री ना. मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांच्या हस्ते जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत लाभार्थ्यांना सातबारा प्रमाणपत्र तसेच भुमिहिनांना घरकुलांसाठी जागा वाटपाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.या बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींच्या सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी, समाज कल्याण सहायक आयुक्त आणि प्रकल्प संचालक यांनी सादरीकरण केले.