कृष्णाला अहेरात मिळालेल्या अहिरवाड्यात नवरात्रोत्सव

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
आर्वी, 
navratri-festival-in-ahirwada : अहिरवाडा येथील राजा भीमकाच्या काळातील आई जगदंबा भवानीचे मंदिर प्राचीन काळातील असल्याचे येथील भाविक सांगतात. मंदिरामध्ये आश्विन नवरात्र महोत्सव व चैत्र नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. या नवरात्रोत्सवात आई जगदंबेच्या दर्शनासाठी परिसरासह इतर राज्यातूनही भतांची मांदियाळी असते.
 
 
 
j
 
 
 
वर्धा नदीवर मोठे धरण बांधण्यात आल्यामुळे अहिरवाडा गाव हे धनोडी लोअर वर्धा धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये आले. अहिरवाडा गावाचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी मंदिर मात्र त्याच ठिकाणी कायम असून मंदिराच्या सभोवताल पाणीच पाणी आहे. अहिरवाडा येथील आई जगदंबेच्या मंदिराबाबत अनेक आख्यायिका असून ऐतिहासिक असलेले हे मंदिर विश्वस्त मंडळांनी केलेल्या विकास कामे व सुधारणेमुळे आज सुंदर व आकर्षक आहे.
 
 
प्रभू रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण या दोन्ही अवताराशी संबंधित कौंडण्यपूर या तीर्थक्षेत्राच्या पंचक्रोशीत भगवती जगदंबेचे स्थान म्हणून ओळखले जाते. कौंडण्यपूर येथे अंबादेवीचे सुप्रसिद्ध प्राचीन मंदिर असून तेथून श्रीकृष्णाने रुख्मिणीला पळून नेण्याचा इतिहास आहे. हे मंदिर तात्कालीन राजाच्या राजप्रसादाचा भाग असावा व त्यामुळे सर्वसामान्य प्रजेसाठी अहिरवाडा येथील सध्याच्या भगवती जगदंबेचे मंदिर बांधण्यात आले असावे असाही विश्वास आहे. अहिरवाडा येथील जगदंबा भवानी ही बर्‍याच कुटुंबाची कुलदैवत असल्यामुळे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड व देशातील इतर भागातून सुद्धा मोठ्या संख्येने भाविक दर्शनाकरिता अहिरवाडा येथे येत असतात.
 
 
श्रीकृष्णाला रुमिणी विवाहानंतर हे गाव अहेरात देण्यात आल्यामुळे बाकळी नदीच्या तिरावर असलेल्या या गावाला अहिरवाडा हे नाव देण्यात आले असावे, असे या भागातील लोक सांगतात. दररोज पहाटे ५ ते ६.३० वाजेपर्यंत काकड आरती, ७ ते ८ आईचा अभिषेक, पाद्य पूजा, सकाळी ८ ते संध्याकाळी ७ आईची आरती, दुपारी महिला मंडळाद्वारे सत्संग, सायंकाळी ७.३० ते ८.३० पर्यंत हरिपाठ व रात्री ९ ते १२ पर्यंत भजन व कीर्तन होईल. १ ऑटोबर रोजी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन व दुपारी २.३० ते ५.३० नवदुर्गा पूजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सव काळात भतांनी सहभाग घेऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जगदंबा भवानी देवस्थानचे अध्यक्ष बाळू इंगोले, उपाध्यक्ष दिवाकर भेदरकर व विश्वस्तांनी केले आहे.