कारंजात स्कूल व्हॅनचा अपघात

१३ चिमुकल्यांचे प्राण थोडयात वाचले

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
कारंजा लाड,
school van accident karanja २६ सप्टेंबर रोजी सकाळी सहारा कॉलनी, गायकवाड नगर आणि भारत नगर येथील एका शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी टाटा मॅजिक स्कूल व्हॅन मानोरा रोडवरील पाटील दूध संकलन केंद्राजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात घसरून पलटी झाली. गाडी पलटी झाल्यावरही सुदैवाने सर्व १३ लहान मुले सुखरूप बचावली. अपघातस्थळी बाभळीचे काटे आणि चिखल असल्याने परिस्थिती अधिकच भयावह होती.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मुलांना बाहेर काढले.
 
 

school van accident karanja 
मानव सेवा हेल्पलाइनचे सिकंदर खान व समाजसेवक भारत तोडकर यांनी चिखलात उतरून गाडी खाली आणखी मुले अडकली आहेत का याची खात्री केली. कारण गाडीमध्ये नेमकी किती मुले होती याची स्पष्ट माहिती नव्हती. चिखलात साप असतानाही त्यांनी धाडसाने शोधमोहीम केली. अपघाताची माहिती मिळताच मेस्को सुरक्षा रक्षक महेंद्र घुडे यांनी श्रीगुरु मंदिर रुग्णवाहिकेचे सेवक रमेश देशमुख यांना कळवले आणि ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच सर्वधर्म संस्थेचे अध्यक्ष शाम सवई, सासचे अजय ढोक आणि शिवनेरी रुग्णवाहिकेचे विनोद खोंड यांनीही मदतकार्य केले. घटनास्थळावरील नागरिकांचे म्हणणे आहे की कारंजातील सिंधी कॅम्प परिसर, खान पेट्रोल पंप समोरील जागा आणि स्मशानभूमी रोड याठिकाणी मोठे ट्रक महिनो महिने उभे राहतात. या ट्रकांमुळे रस्ते अरुंद होऊन अपघाताची शयता वाढते.
आपल्या मुलांच्या स्कूल व्हॅनची फिटनेस तपासणी, कागदपत्रे, विमा याची खात्री करा.थोडे जास्त पैसे लागले तरी गुणवत्तापूर्ण, परवाना असलेली स्कूल व्हॅन निवडा. व्हॅनमध्ये नियमांपेक्षा जास्त मुले कोंबली जात नाहीत ना यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. देवाच्या कृपेने कोणत्याही बालकाला इजा झाली नाही. मात्र हा प्रसंग पालक, शाळा व्यवस्थापन आणि प्रशासनासाठी मोठा इशारा आहे. भविष्यातील गंभीर अपघात टाळण्यासाठी आरटीओ विभागाने तातडीने सर्व स्कूल व्हॅनची संपूर्ण कागदपत्रे व फिटनेस तपासणी करावी, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.