नागपूर,
Shri Narkesari Prakashan Limited : श्री नरकेसरी प्रकाशन लि.ची 75 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, 26 सप्टेंबर राेजी रामदासपेठ येथील संस्कृती सेलिब्रेशन सभागृहात सायंकाळी 5 वाजता उत्साहात पार पडली. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्षाचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला.
या सभेला श्री नरकेसरी प्रकाशन लि.चे अध्यक्ष डाॅ. विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, संचालक मंडळातील उदयभास्कर नायर, समीर गाैतम, आशीष बडगे, अशाेक मानकर, मीरा कडबे, श्रीकर साेमण, प्रदीप काळेले, संदीप पाेशट्टीवार आदी संचालकांसह भागधारक उपस्थित हाेते. श्री नरकेसरी प्रकाशन लि.चे प्रबंध संचालक धनंजय बापट यांनी सभेचा वार्षिक अहवाल यावेळी सादर केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच तरुण भारतचे शताब्दी वर्ष व नरकेसरी प्रकाशनच्या अमृत महाेत्सवी वर्षाचे औचित्य साधत तरुण भारत परिवाराने वर्षभरात राबविलेल्या वटवृक्ष राेपांचे वाटप, बीज अंकुरे अकुरे अभियान, आणिबाणी संघर्षातील नायकांचा सत्कार, मंदिर स्वच्छता अभियान, तुळस राेपांचे वाटप, शंभर शाखांना भेटी आदी उपक्रमांविषयीची माहिती धनंजय बापट यांनी सभासदांना दिली. साेबतच 2 ते 5 नाेव्हेंबरदरम्यान राबविण्यात येत असलेल्या सामूहिक तुळशी विवाह उपक्रमाचीही माहिती दिली. संस्थेला या वर्षात 1 काेटी 75 लाख रुपये निव्वळ नफा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्थेतील यंत्रणांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. किरण नाईक, दत्ताजी टेकाडे, सुनील किटकरू, गिरीश उपाध्याय यांनी विविध विषयांवर चर्चा उपस्थित केली.
अध्यक्षीय भाषणात श्री नरकेसरी प्रकाशन लि.चे अध्यक्ष डाॅ. विलास डांगरे म्हणाले, तरुण भारताची उत्तराेत्तर प्रगती हाेत राहावी ही संपूर्ण परिवाराची भावना आहे. यासाठी संपूर्ण तरुण भारतची चमू सातत्याने प्रयत्नशील आहे. आपले वृत्तपत्र सर्वत्र पाेहाेचण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. हाेमिओपॅथी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण याेगदानासाठी भारत सरकारने डाॅ. डांगरे यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार बहाल केला. त्यानिमित्त त्यांचा संपूर्ण भागधारकांच्या वतीने माजी संचालक पद्माकर खरे, विश्वास बक्षी आणि समीर बाकरे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. सभेच्या प्रारंभी वर्षभरातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.