खोट्या प्रमाणपत्रावर काम मिळवणार्‍या ठेकेदारावर कठोर कारवाई व्हावी

*आ. बकाने यांची मागणी

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
देवळी,
Rajesh Bakane : ग्रामीण रस्त्यांचे काम फसवणूक करून मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला असून मे. नयन इंटरप्राईजेस वर्धा यांनी खोटे प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केल्याचे जिल्हा परिषदेच्या चौकशीत उघड झाले. शासनाच्या डोळ्यात धुळ फेकून काम मिळवणार्‍या ठेकेदारावर कारवाई करून कंपनी काळ्या यादीत टाकल्याच गेली पाहिजे, अशी मागणी आ. राजेश बकाने यांनी केली आहे.
 
 
 
bakane
 
 
 
जिल्हा नियोजन समितीच्या लेखाशीर्ष ३०५४ व ५०५४ अंतर्गत ग्रामीण रस्ते विकासाकरिता २०२४-२५ मध्ये निधी उपलब्ध झाला होता. संबंधित निविदांमध्ये हॉट मिस प्लांट सुस्थितीत असणे बंधनकारक अशी अट होती. या निविदेत मे. नयन इंटरप्राईजेस यांनी दयालनगर, बोरगाव मेघे येथील हॉट मिस प्लांट सुरू असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केले. मात्र आपण केलेल्या तक्रारीनंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने चौकशी केली. चार अभियंत्यांच्या समितीने केलेल्या पाहणीत प्लांट बंद, जंगलेली मशिनरी, गवत वाढलेली, वीज कनेशन तोडलेले अशा अवस्थेत आढळले. म्हणजेच नयन इंटर प्राईजेसने काम मिळवण्यासाठी प्रशासनाला खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले.
 
 
सह. मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपूर यांनी देखील २७ जानेवारी रोजी दिलेले फिटनेस प्रमाणपत्र रद्द करत या फसवणुकीची नोंद केली आहे. जिल्ह्यातील विकासकामे पारदर्शक, दर्जेदार आणि शेतकर्‍यांना उपयोगी ठरावी हीच आमची भूमिका आहे. पण, खोट्या प्रमाणपत्रावर ठेके मिळवणार्‍या ठेकेदारांना आपण अजिबात पाठीशी घालणार नाही. शासनाची फसवणूक करून जनतेचा पैसा लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या नयन इंटरप्राईजेसला तात्काळ काळ्या यादीतटाकण्यात यावे. अशा भ्रष्ट प्रवृत्तीविरुद्ध कठोर उदाहरण घालून दिलेच पाहिजे, अशी कडक भुमिका आ. बकाने यांनी घेतली आहे.