निर्भय विचारपर्वाचा अस्त!

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
 
अग्रलेख...
sl bhairappa जन्माला येणाऱ्या प्रत्येक जिवाच्या जगण्यावर निसर्गाने काही जबाबदारी सोपविलेली असते. त्यामुळे जेथे किडामुंग्यांच्या जगण्यालाही काही अर्थ असतो, तेथे माणसाचा जन्म मिळाल्यानंतरच्या जबाबदारीचे ओझे काही अधिकच असणे साहजिकही असते. त्याच्या जगण्याचे सार्थक व्हावे यासाठी नियतीने त्याला त्याच्या जीवनाची चौकट आखून दिलेली असते. अनेकांस नियती वगैरे कल्पना कपोलकल्पित वाटत असल्या, तरी एखाद्याच्या जगण्याचा सूक्ष्म अभ्यास केला तर या संकल्पनेबद्दलचे तथ्य कळते. जन्माला यावे आणि श्वास घेणे शक्य आहे, तोवर जगत राहावे अशा भावनेने उभे आयुष्य केवळ खर्ची घालणारेच बहुसंख्य. अशात जगण्याचे सार्थक करण्याच्या भावनेने झपाटलेल्यांची आयुष्ये आदर्श ठरतात. असा एक आदर्श बुधवारी काळाच्या पडद्याआड गेला. आजकाल सीमावाद, प्रांतवाद, भाषावादाच्या भेदाने मनामनांत द्वेषाच्या आणि तिरस्काराच्या भिंती रचल्या जात असताना, हे वाद गाडून टाकून सांस्कृतिक दुवा किंवा भेद मिटवून मने जुळविणारा सेतू म्हणून भूमिका बजावण्याच्या नियतीने सोपविलेल्या जबाबदारीचे भान जपणाऱ्या संथेशीवर लिंगणय्या तथा एस. एल भैरप्पा नावाच्या सरस्वतीपुत्राने बुधवारी आपल्या सुमारे 94 वर्षांच्या आयुष्यातील अखेरचा श्वास घेतला. साहित्य, संस्कृती, विचार आणि व्यवहार यांची विवेकी सांगड घालून नियतीने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडून या कृतार्थ आयुष्याची अखेर झाली. नवयुगातील एक साहित्यिकपर्व समाप्त झाले.
 
 

s l भैरप्पा  
 
 
भैरप्पा नावाची व्यक्ती आपल्या कर्तव्याची जबाबदारी पार पाडून जगातून अज्ञाताच्या प्रवासास रवाना झाली असली, तरी तिने उभ्या केलेल्या साहित्यिक सेतूने भेदाच्या साऱ्या भावना पुसून टाकून मने जोडणाऱ्या सेतूची भूमिका मात्र पुरेपूर प्रामाणिकपणे बजावली आहे. म्हणूनच भैरप्पा यांच्या जाण्याने भाषा-प्रांताच्या सीमा पुसून दुःखाने असंख्यांची मने व्याकुळ केली. सत्याच्या शोधाची जबाबदारी घेऊनच ते आयुष्यभर जगले. एकदा सत्याचा शोध लागला की, कितीही प्रयत्न केला तरी ते दडपले जात नाही, या अनुभवाने त्यांनी आपले जगणे सार्थकी लावले. आपल्या आयुष्याला आनंदाचे कोंदण लावणे आणि इतरांच्या आयुष्यात आनंद पेरणे ही काही कला वगैरे नाही. तो सत्त्वगुण असतो. सत्त्वगुण हरवला तर आनंद कुठे आढळणार, हा त्यांचाच विचार आणि हेच त्यांच्या जीवनाचे सार असावे. नियतीवर श्रद्धा ठेवून आपले जगणे तिला समर्पित केले की, जगण्याचा मार्ग आपोआप दिसू लागतो. वैयक्तिक जीवनात असो वा सामाजिक जीवनात, प्रत्येक परंपरेचा स्वतःचा एक वेगळा उद्देश असतो. कोणत्याही परंपरेस इतर कोणाहीपेक्षा श्रेष्ठ वा कनिष्ठ समजू नये. जीवनाचे मूल्य आणि मूलभूत ध्येय स्पष्टपणे उमगले असेल, तर दुय्यम बाबींनाही जीवनाशी जुळवून घेणे अवघड होत नाही, असे म्हणणाऱ्या भैरप्पा यांना नियतीने आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव जीवनभर होती. बहुधा तीच त्यांच्या लेखनाची प्रेरणाही होती. म्हणूनच वाचकाची भाषा कोणती याचा त्यांनी साहित्य निर्मितीच्या काळात फारसा विचार केला नाही. वाचक नावाच्या समाजाशी आपले नाते आहे, हेच त्यांना ठाऊक होते. तो कोणत्या प्रांताचा आहे, कोणत्या भाषा बोलतो, हे त्यांनी फारसे महत्त्वाचे मानले नाही.sl bhairappa त्यामुळेच वाचकाशी संवाद साधण्यासाठी ते सदैव उत्सुक राहिले आणि त्या संवादातूनच, बालपणापासून मनात घर केलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत राहिले. या शोधाच्या जाणिवा एवढ्या तीव्र आणि प्रगल्भ होत्या की, त्यासाठी त्यांनी नैतिक मूल्ये आणि आजच्या जीवनातील मूल्ये या विषयाचा अभ्यासाध्यास घेतला. त्यातून साकारलेल्या साहित्यकृतींतून त्यांची शोधयात्रा सुरू झाली. भैरप्पा यांच्या कल्पनाशक्ती आणि निर्मितीक्षमतेच्या प्रवासास यातून दिशा मिळाली आणि कादंबरी लेखनातच कल्पनाशक्ती व्यक्त करण्याची क्षमता आहे, हे साहित्य विश्वाचे सत्य त्यांना आकळले. अनेक जण बुद्धिमान असतात, पण ते अभ्यासू असतीलच असे नाही. अनेक जण अभ्यासू असले, तरी बुद्धिमान असतीलच असेही नाही. भैरप्पा यांनी बुद्धिमत्ता आणि अभ्यासू वृत्ती यांची सांगड घालत कादंबरी लेखनशैलीच्या माध्यमातून आपल्या कल्पनाशक्तीला अभिव्यक्तीची दारे उघडून दिली. तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन निर्माण केलेले साहित्य शाश्वत ठरते, याची त्यांना जाणीव होती. आपण तत्त्वज्ञानाविषयी लेखन करू शकलो नाही, तरी आपल्या साहित्यातून तत्त्वज्ञान मांडले जावे यासाठी त्यांनी आपली लेखणी, बुद्धी, अभ्यासू वृत्ती आणि विवेक वृत्ती पणाला लावली. जागतिक पातळीवर उत्तम साहित्य म्हणून ज्याची गणना केली जाते, त्या साहित्याचा स्रोत मजबूत होता. साहित्य निर्मितीची कल्पना कसदार असेल, त्यामध्ये समाजमनाचा हुंकार असेल तर ती साहित्यकृती चिरकाल टिकते आणि वाचकांस आपलीशी वाटते. जीवनातील कटु अनुभवांवर आपल्या सर्जनशीलतेने कशी मात करावी, हे उमगले की अशी साहित्यकृती आकाराला येते. कदाचित या अनुभवामुळेच बालपणी आप्तांच्या मृत्यूंच्या अनुभवांच्या स्मरणांना तत्त्वज्ञानाची जोड देणारी त्यांची साहित्य निर्मिती वाचकांस आपलीशी वाटली आणि थेट वाचकांशी नाते जोडत राहिली.
वयाच्या जेमतेम तेराव्या वर्षी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन, पारंपरिक शालेय शिक्षणात खंड पडल्यानंतर केलेल्या प्रदीर्घ भ्रमंतीतून त्यांनी जगण्याच्या तत्त्वज्ञानाचा शोध घेतला. या भ्रमंतीत त्यांनी मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर हमाली केली. आध्यात्मिक शांतीच्या शोधात काही साधुसंतांसोबत प्रवास केला. काही नेमके हाती लागल्यानंतर पुन्हा पारंपरिक शिक्षणाकडे वळून तत्त्वज्ञानातील डॉक्टरेट मिळविण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास हा अनुभूतीच्या शोधाचा आणि सर्जनशीलतेच्या पोषणाचा प्रवास होता. या प्रवासात आणि पुढे प्राध्यापकीच्या पेशात त्या सर्जनशीलतेस व्यक्त होण्याची आस लागली. 1958 मध्ये ‘भीमकाया’ व 1962 साली ‘वंशवृक्ष’ या कादंबèयांतून जीवनाचे तत्त्वज्ञान व त्याचा त्यांना उमगलेला अर्थ उलगडत गेला. पुढे सलग 50 वर्षे हा लेखनयज्ञ अखंडपणे सुरू राहिला आणि त्यातून सिद्ध झालेल्या कादंबऱ्या व आत्मचरित्राने भाषाभेदाच्या भिंती तोडून वाचकांच्या विश्वात आपले स्थान अधोरेखित केले.sl bhairappa जन्म कर्नाटकात झाला असला, तरी आपण अगोदर भारतीय आणि नंतर कर्नाटकी आहोत. आपल्या हृदयीचे सत्य सांगणाऱ्या साहित्याची अभिव्यक्ती मातृभाषेतूनच अधिक प्रभावीपणे करता येते. म्हणूनच त्यांनी त्यांच्या मातृभाषेत- कन्नडमधून लेखन केले असले, तरी आपली लेखनाची संकल्पना सदैव भारतीयच असल्याने आपण केवळ कन्नड लेखक नाही तर भारतीय लेखक आहोत, या भावनेनेच त्यांनी साहित्यसेवा केली. वाचकांनीही भाषाभेद विसरून त्याचे स्वागत केले. त्यांच्या या साहित्यसेवेस वाचकांनी तर सलाम केलाच; पण साहित्य अकादमी पुरस्कार, पंपा पुरस्कार, एनटीआर नॅशनल लिटररी अवॉर्ड, नडोजा पुरस्कार, वाग्विलासिनी पुरस्कार, बेटागिरी कृष्णशर्मा पुरस्कार, नृपतुंगा पुरस्कार, कृष्णदेव पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यकृतींवर सन्मानाचे तोरण चढविले. पद्मश्री, पद्मभूषण अशा किताबांनी सरकारनेही त्यांच्या कार्याचा गौरव केला.
मी लेखक म्हणून केवळ सत्य शोधतो, ते लेखन कोणास पटले नाही तरी हरकत नाही, पण राजकीय सोयीसाठी किंवा कल्पितावर आधारित लेखन करणार नाही, ही ठाम भूमिका घेऊन त्यांनी केलेल्या लेखनातून अनेक वादही जन्माला आले. कारण त्यांचे विचार पारंपरिक विचारांच्या चौकटीला छेद देणारे, धक्के देणारे आणि ऐतिहासिक किंवा धार्मिक कथनाविषयी प्रश्न विचारणारेही होते. ते कधी राजकारणाला भिडणारेही होते. साहित्य विश्वातील डाव्या बुद्धिजीवींनी त्यांच्या लेखनावर कठोर टीका केली. पण सामान्य वाचकांत मात्र हेच लेखन प्रचंड लोकप्रिय ठरले. या लेखनाने भाषेच्या सीमा सहजतेने ओलांडल्या. धर्मश्री, मंद्र, परवा या त्यांच्या कादंबऱ्यांनी भारतीय समाजातील धार्मिक कर्मकांड, संगीत, अध्यात्म आणि वैयक्तिक अस्तित्वाच्या मुद्यांवरही प्रश्नचिन्हे उभी केली आणि धार्मिक व उदारमतवादी विचारवंतांनी त्यावर टीकेची झोडही उठविली. इतिहास सांगताना त्याचे नाहक राजकीय शुद्धीकरण न करता केवळ सत्य तेच मांडले पाहिजे, अशी भूमिका घेत त्यांनी आपल्या लेखनाचे आणि विचारांचे ठामपणे समर्थनही केले. सोयीस्करपणे वास्तव दडपण्यासाठी मौन पाळणाऱ्या इतिहासकारांवरही टीका केली. लोकप्रियतेसाठी लिहिणारे लेखक आणि वास्तवाशी भिडताना भीडमुर्वत न ठेवणारे लेखक अशा दोन प्रकारांत साहित्य विश्व विभागले गेलेले असताना, भैरप्पा नावाच्या या भयमुक्त लेखकाच्या साहित्याने वाचकांच्या विश्वाला मात्र इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी आणि धार्मिक व सांस्कृतिक समजुतींचा पुनर्विचार करण्याची शक्ती दिली. वादाशी त्यांचे नाते जडले, पण त्यातून त्यांच्या साहित्याची स्वीकारार्हता अधिक चमकदार झाली आणि त्यांच्या लेखनाचा प्रभावही वाढत गेला. सत्याला सामोरे जाण्याची हिंमत समाजात रुजविणे हीच बहुधा नियतीने त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी असावी. ती प्रामाणिकपणे पार पाडून अज्ञाताच्या प्रवासास निघून गेलेल्या या तत्त्वज्ञ विचारवंतास विनम्र श्रद्धांजली.