मुंबई
Trisha Thosar National Award फिल्म इंडस्ट्रीतील एक अनोखा विक्रम यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात घडला. अवघ्या चार वर्षांची त्रिशा थोसर हिने सर्वोत्तम बाल कलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार पटकावत एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, तिने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक रत्ने जोडलेल्या साउथ सुपरस्टार कमल हासन यांचा ६५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
त्रिशाने "नाल २" या तमिळ चित्रपटात ‘चिन्नी’ ही भूमिका साकारली असून, तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मनं जिंकली. याच भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम बाल कलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. याआधी १९६० साली केवळ सहा वर्षांच्या वयात कमल हासन यांना "कलाथुर कन्नम्मा" या चित्रपटासाठी प्रेसिडेंट्स गोल्ड मेडलने गौरवण्यात आले होते. त्यांच्या या विक्रमाला ६५ वर्षांपर्यंत कोणीही स्पर्श करू शकले नव्हते.
त्रिशाच्या या यशाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनी स्वतः सोशल मीडियावरून त्रिशाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, “प्रिय त्रिशा थोसर, तुला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. जेव्हा मी सहा वर्षांचा होतो, तेव्हा मला माझा पहिला पुरस्कार मिळाला होता. तू माझा विक्रम मोडला आहेस. तुला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आपल्या प्रतिभेवर विश्वास ठेव आणि असेच पुढे जात राहा.”कमल हासन यांच्या या शुभेच्छा पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी त्रिशाच्या लहान वयात मिळालेल्या या मोठ्या सन्मानाचे कौतुक केले, तर काहींनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या वर्षीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा अनेक कारणांनी खास ठरला. शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि विक्रांत मेस्सी यांना त्यांच्या अभिनयासाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दक्षिणेचे दिग्गज अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मात्र, या सर्व दिग्गजांच्या उपस्थितीतही नन्ही त्रिशा थोसर हिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
त्रिशाच्या या यशामुळे भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवीन बालकलाकार लाभला आहे, ज्याच्या वाटचालीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अभिनयातील नैसर्गिकता आणि बालसुलभ सहजतेमुळे त्रिशाने जो ठसा उमटवला आहे, तो खरोखरच उल्लेखनीय आहे. तिच्या या कामगिरीने फक्त एक विक्रम मोडला नाही, तर नव्या पिढीला प्रेरणादायी ठरले आहे.