सोलापूर,
Two farmers commit suicide in Solapur सोलापूर जिल्ह्यात सलग पावसामुळे शेतीसह लोकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहेत. मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे आणि तलाव तुडुंब भरले असून अनेक गावांना वेढा घातला आहे. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बार्शी तालुक्यातील दहिटणे आणि कारी गावात दोन शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दहिटणे गावातील ५८ वर्षीय लक्ष्मण काशिनाथ गवसाने अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे फक्त दीड एकर कोरडवाहू शेती होती. सलग पावसामुळे शेतात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच, गवसाने काही दिवसांपासून शारीरिक आजाराने त्रस्त होते आणि मानसिक तणावाखाली होती. २४ सप्टेंबर रोजी त्यांच्या मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, ज्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली.
तसेच कारी गावात ४५ वर्षीय शरद भागवत गंभीर यांनी आत्महत्या केली. गंभीर यांची साडेतीन एकर शेती होती आणि त्यांनी पेरू व लिंबूची लागवड केली होती. सलग पावसामुळे बाग पूर्णपणे नष्ट झाली आणि त्यांच्याकडे बँकेकडून ७ लाख तसेच गावातील लोकांकडून ३ लाख रुपये कर्ज होते. उत्पन्नाची शक्यता न राहिल्याने आणि कर्जफेडीच्या तणावाखाली गंभीर यांनी गायीला बांधलेल्या दावणाच्या दोरीने गळफास घेतला. स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये या घटनांची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असून तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनांमुळे स्थानिक शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.