पोलिसांवरील हल्ल्यात ३ महिला; २० पुरुष!

एकाला न्यायालयीन तर अन्यांना पोलिस कोठडी

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
वर्धा, 
wardha-attack-on-police : सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या शीखबेडा येथे सुरू असलेल्या जुगारावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर तलवारीने प्राणघातक हल्ला चढविण्यात आला. २५ रोजी घडलेल्या या घटनेत २ पीएसआय, १ सहाय्यक फौजदार जखमी असे तिघे जखमी झाले. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजकुमार बावरी फरार असून सावंगी पोलिसांनी ३ महिला व २० पुरुष असे २३ जणांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता २२ आरोपींची एक दिवसीय पोलिस कोठडी तर एका आरोपीला न्यायालयीन कोठडी ठोठावली.
 

 jk 
 
 
 
गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे जुगार्‍यांवर कारवाईसाठी सावंगी पोलिसांची चमू शीख बेड्यावर गेली होती. यात पोलिस उपनिरीक्षक सतीश दुधाने, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे आणि सहाय्यक फौजदार संजय पंचभाई यांचा समावेश होता. कारवाईसाठी पोलिस आल्याची चाहूल लागताच जुगार्‍यांसह ज्याच्या घरी जुगार भरविण्यात आला होता त्याने पोलिसांवरच तलवारीने हल्ला केला. यात दुधाने, शिंदे आणि पंचभाई हे जखमी झाले. याप्रकरणी सावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी २३ आरोपींना अटक केली. अटकेतील आरोपींना आज शुक्रवारी वर्धा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २२ आरोपींना एक दिवसीय पोलिस कोठडी तर एका आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. फरार असलेला मुख्य आरोपी राजकुमार बावरी याला लवकरच अटक करू असा विश्वास सावंगी पोलिसांकडून व्यत केला जात आहे.