वर्धा,
solar panels : मानव व वन्यजीव संघर्ष तसेच वन्यप्राण्यांकडून पिकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने राज्य शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अंमलात आणली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७१८ गावातील १९ हजार ८५९ शेतकर्यांना अनुदानातून सौर कुंपन दिल्या जाणार आहे. लाभार्थ्यांच्या यादीला वनविभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
जिल्हातील मोठा भूभाग जंगल व्याप्त आहे. शेती जंगल परिसराला लागून असल्याने नेहमी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकर्यांना गंभीर स्वरूपाची इजा होते अथवा जीव गमवावा लागतो. पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकारातून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अंमलात आणून योजनेतंर्गत शेतकर्यांना सौर कुंपन देण्याचा निर्णय घेतला. मागील तीन वर्षात ज्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा हैदोस होता त्या गावांची निवड या योजनेंतर्गत करण्यात आली आहे. ७५ टक्के अनुदान राज्य सरकार देणार असुन २५ टक्के रक्कम शेतकर्यांना द्यावी लागणार आहे. या योजनेच्या लाभासाठी शेतकर्यांनी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केले होते. त्या अर्जांची छानणी करून मंजूर देण्यात आली आहे. जिल्ह्यात वर्धा, आर्वी, कारंजा, तळेगाव, आष्टी, समुद्रपूर, खरांगणा, हिंगणी आदी वनपरिक्षेत्र आहे. या क्षेत्रातंर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
सौर कंपनामुळे पिकांचे संरक्षण ः ना. डॉ. भोयर
सौर कुंपणामुळे पिकांच्या होणार्या नुकसानीला पायबंद बसणार आहे. शेतकर्यांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहे. या योजनांचा शेतकर्यांना लाभ घ्यावा. बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्या मेटहिरजी, येनीदोडका, गरमसूर, उमरी-विहरी, मरकसूर या पाच गावांचा बोर प्रकल्पाच्या विस्तारीत क्षेत्रात समावेश करण्यात आला. लवकरच या गावांच्या पुर्नवसनाची प्रक्रिया प्रारंभ होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी कळवले आहे.