वेदमंत्रांच्या सुगंधाने दरवळली वर्ध्याची वाट!

* कपडा लाईन आणि राम दरबार चौकात सजावट

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
वर्धा, 
Wardha-Navratri Festival : वर्धेतील नवरात्रोत्सव म्हणजे दिवाळी आणि सुकाळ! अख्खे शहर नववधूसारखे नटते आणि अगदी गल्ल्या विद्युत रोषणाईने उजळून निघते. चौकाचौकात लंगर लागतात. यावर्षी शहरातील दुर्गा मंडळांनी सजावटींचा ट्रेंड बदलला. कपडा मार्केट आणि राम दरबार या देवी मंडळांनी चक रस्त्यावर वेद मंत्रांची छाया निर्माण केल्याने वर्धेची वाट वेदमंत्रांच्या सुगंधाने दरवळली असेच म्हणाले लागेल.
 
 
jh
 
 
वर्धेत साधारणत: १९६५ च्या काळात एकच देवी बसवल्या जात होती. ती इतवारा बाजार परिसरात माजी नगराध्यक्ष मारोतराव देशकर बसवत होते, अशी आठवण माजी नगरसेववक कमल कुलधरिया यांनी सांगितली. आता वर्धा शहरात १०६ तर आजूनबाजूला मिळून १९० ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना केली जाते. चढाओढीतून एकाचे दोन मंडळ झाले. त्यामुळे पुन्हा आकर्षक रोषणाईची स्पर्धा होऊ लागल्याने शहरात देवी उत्सव मंडळांची संख्या वाढली. सराफा लाईनच्या दुर्गा मंडळाला ५५ तर त्यातून वेगळे होत कपडा लाईन दुर्गादेवी मंडळला ५० वर्षे पुर्ण झाले. कपडा लाईन दुर्गा मंडळाने रस्त्यावर आसमंताकडे बघत नावीन्यपूर्ण अशी सजावट केली आहे. देवीची स्तुती करणारे मंत्र कपड्यावर लिहिले असुन ते पानाफुलांनी सजवले असल्याने रस्त्यावर आज वेदमंत्रांचे अक्षरशः दरवळणारे फुलपाखरं उतरल्यासारखं भासत होतो. सकाळी सूर्य उगवताना संपूर्ण शहरावर एक अदृश्य, पण जिवंत झगमगाट पसरला—ना फत रंगांचा, ना केवळ प्रकाशाचा तो होता प्राचीन मंत्रांच्या स्पंदनांचा.
 
 
राम दरबार चौकातील हनुमान मंदिर देवस्थान दुर्गापूजा उत्सव समितीला २५ वर्षे पुर्ण झाले. यावर्षीच चौकाला राम दरबार नाव देण्यात आल्याने या दुर्गापुजा उत्सव समिती राममय झाली आहे. मुख्य मार्गावर उभ्या केलेल्या कमानींवर प्रभुरामाचा आकर्षक फोटो सुवर्ण झोत पडताच लोकांचे पाय आपोआप थबकतात. रस्ता दुभाजकावर वेगवेगळ्या मंत्रांसह रामरक्षेतील श्लोक लिहिले असुन दिवसभर रामरक्षेचे पाठ चालतात. याशिवाय शास्त्री चौकातील दुर्गादेवी मंडळालाही ५० वर्षे पुर्ण झाले आहेत. त्यामुळे वर्धेत भतीचा सुगंध, दीपांच्या उबदार तेजानं न्हालेली गल्ली आणि शंख नादात घुमणारी वैदिक स्वरलहरी सुखावून जाते. वेदमंत्र फत पठणासाठी नाहीत तर जगण्याचा सुवास आहे. तो सुवास वर्ध्याच्या रस्त्यांनी ओंजळीत भरला आहे. संध्याकाळी लालसर आकाशाखाली दीपांच्या ओघळांनी सजलेल्या या रस्त्यावरून जाताना प्रत्येक प्रवासी थबकल्याशिवाय राहत नाही. पावसाने मात्र या सार्‍या आनंद आणि उत्सवावर पाणी फेरले आहे.