थांब्यासाठी विद्यार्थ्यांनी अडवली एसटी

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
वर्धा, 
students blocked ST : वर्धा-आर्वी महामार्गावरील मजरा येथे आज शुक्रवार २६ रोजी सकाळी विद्यार्थी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत महामंडळाच्या बसेस अडवून धरल्या. गेल्या काही दिवसांपासून प्रवासी निवार्‍याजवळ एसटी बसेस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांसह नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला.
 
 
jk
 
 
मजरा व परिसरातील विद्यार्थी दररोज वर्धा, आर्वी व इतर ठिकाणी शिक्षणासाठी प्रवास करतात. मात्र, एसटी महामंडळाच्या सुपर गाड्या मजरा येथील प्रवासी निवार्‍याजवळ थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत होता. यामुळे त्यांच्या वेळेचा व पैशांचा अपव्यय तर होतच होता शिवाय शैक्षणिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत होते. आज सकाळी मजरा गावाजवळून जाणार्‍या एसटी बसगाड्या विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी अडवल्या. यावेळी चालक व इतर कर्मचार्‍यांना लेखी निवेदन देण्यात आले. प्रवासी निवार्‍याजवळ नियमित थांबा द्यावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंब करावा लागेल, असा इशारा देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 
 
या प्रकारामुळे महामार्गावरील काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. परिस्थिती बिघडण्याआधीच अधिकार्‍यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यत केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी सुपर गाड्यांना प्रवासी निवार्‍याजवळ थांबा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पुन्हा देण्यात आला.