vedic-literature
घटस्थापनेपासून नवरात्रोत्सव जागर उत्सवाला सर्वत्र उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्रात खरं तर जागर हा स्त्री शक्तीचा व्हायला हवा. अनेकजण या माध्यमातून तो करतांना दिसतही आहेत. ऋग्वेद सर्वात प्राचीन वाङ्मय समजले जाते. यात दहा मंडले असून त्यातील निरनिराळ्या सूक्तांची रचना वेगवेगळ्या ऋषींनी केली आहे. या ऋषींना आपण मंत्रद्रष्टे म्हणतो कारण, त्यांच्याकडे जी दिव्य दृष्टी आहे त्याद्वारे ते प्रत्यक्षाच्या पलीकडेही पाहू शकतात. या ऋषींमध्ये काही स्त्रियाही आहेत ज्यांनी ऋग्वेदातील काही सूक्तांची, काही ऋचांची रचना केली आहे त्यांना ब्रह्मवादिनी म्हणत. वेद उपनिषद काळापासून स्त्री ही खरं तर पूजनीय आणि वंदनीय आहे. वैदिक काळापासून ती शिक्षित आणि उच्च विद्याविभूषित अशीच होती आणि आजही हे संचित कायम आहे. तिचा प्रतिकात्मक नऊ दिवस आणि सदैव केलेला आदर आणि सन्मान म्हणजेच नवरात्र!

आज सर्व क्षेत्रात ती कार्य करते आहे आणि सर्व शिखर पादाक्रांत करते आहे. हे करण्याचे धैर्य तिला इतिहासातून मिळाले आहे. संस्कारांचे बाळकडू घेऊन स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र स्वतःच्या कर्तृत्ववाने यशोशिखरावर नेले आहे. आज प्रत्येक कार्यक्षेत्रात झोकून काम करायला सदैव तयार असणारी, नव्हे अग्रेसर असणारी स्त्री आहे. vedic-literature ज्या भारताला आम्ही मातेचा दर्जा देतोय त्या भारतातील स्त्री वंदनीय आहे. सर्ववेद, ब्राह्मणे, बृहददेवता, उपनिषदे, महाभारत, पुराणे स्त्री चरित्रांनी भरलेले आहेत. समाजातील विकृतीला सुद्धा प्रसंगी धैर्याने लढणारी रणरागिणी म्हणजे सुद्धा एक स्त्रीच आहे. इतिहासातून मिळालेल्या सद्गुणांचा संचय करत तिची वाटचाल प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास वेद आणि उपनिषदांच्या काळापासून तिच्या पराक्रमाने उन्नत झाला आहे. आपल्या पराक्रमाच्या गाथा तिने त्रिखंडात गाजवलेल्या आहेत.‘ब्रह्मवादिनी‘ या बिरुदावलीत थोडीफार मांडणी करण्याचा प्रयत्न आहे. आज जागतिकीकरणात ती स्वतःला सिद्ध करत जी यशस्वी वाटचाल करते आहे त्या तिच्या कर्तृत्वाने अशीच उंच भरारी घेत रहावी हीच सदिच्छा आहे कारण हे संचित तिला वैदिक काळापासून मिळालेले आहे.
वैदिक वाङ्मय हे जगातील पहिले उपलब्ध वाङ्मय आहे. वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान, ज्ञानाचा विषय किंवा ज्ञान मिळविण्याचे साधन असा होतो. अतिप्राचीन काळामध्ये प्राचीन ऋषिंना वेदवाङ्मयाचा साक्षात्कार झाला म्हणजेच त्यांना वेद दिसले, त्याचे ज्ञान झाले असे यास्काचार्यांनी म्हटले आहे. ऋषी हे मंत्राचे द्रष्टे आहेत, कर्ते नव्हेत. म्हणूनच निरुक्तात ऋषी या शब्दाचा अर्थ ‘ऋषिर्दर्शनात्’ असा दिला आहे. अशा ऋषिंमध्ये स्त्री-ऋषिंचीही गणना केली जाते. vedic-literature ऋग्वेदातील काही ऋक्सूक्ते ऋषिकांनी रचलेली आहेत.
अगदी वेदकाळापासूनच स्त्रियांनी केलेले लेखन अल्प प्रमाणात का होईना पण उपलब्ध आहे. जगातल्या इतर कोणत्याही देशात इतके प्राचीन स्त्री-अभिव्यक्तीचे नमुने सापडत नाहीत. बृहद्देवता या ग्रंथामधे 27 स्त्री ऋषिकांचा उल्लेख मिळतो पण अर्थातच या सगळयाच काही खऱ्या स्त्रिया नाहीत. रात्री, उषा, सूर्या, वाकब नदी, सरस्वती ह्या निसर्गस्त्रिया आहेत. अदिति, इंद्राणी, उर्वशी किंवा यमी ह्या काही पौराणिक स्त्रिया आहेत, तर अपाला, घोषा, रोमषा, लोपामुद्रा, शाश्वती या काही ऋषिका आहेत. त्यांच्या ऋचा महत्त्वाच्या आहेत. यापैकी अनेक ऋषिकांच्या ऋचा या ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळात समाविष्ट केल्या आहेत. तसेच काही ऋचा विवाहसूक्तात, तर काही संवाद स्वरूपाच्या आहेत. ऋग्वेद काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा, यज्ञात सहभागी होण्याचा अधिकार होता. त्या उत्तम कवियत्री होत्या. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते. ऋग्वेदातील अनेक सुक्तांवरून त्या काळातील कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था कशी होती हे देखील दिसते.
वेदातल्या पुरुष ऋषींनी ज्याप्रमाणे त्यांच्या मानवी इच्छा, आकांक्षा, व्यावहारीक अपेक्षा त्यांच्या सूक्तांतून मोकळेपणाने मांडल्या आहेत, तशाच ऋषिकांनीही त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. एक चांगला नवरा, नवèयाचे प्रेम, चांगले स्वास्थ्य एवढीच त्यांची गरज आहे. स्त्रियांच्या या पहिल्या लिखित उद्गारांमधूनही त्यांच्या स्त्रीत्वाची झलक बघायला मिळते. तसेच ऋषिकांच्या लेखनात तत्कालिन कौटुंबिक जीवनाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. विश्ववारा ही लग्न झालेली स्त्री वैवाहिक सुखासाठी आणि निंश्चित, सुरक्षित आयुष्यासाठी अग्नीची प्रार्थना करते. घोषा या राजकन्येला कुष्ठरोगाने पछाडले आहे आणि त्यामुळे तिला नवरा मिळत नाही. ती अश्विनीकुमार या दैवी वैद्यांची आरोग्यपूर्ण शरीरासाठी प्रार्थना करते आणि मग ती मागणी करते की तिचे घरी राहूनच वय वाढत आहे तर अश्विनीकुमारांनी तिला एक देखणा पती मिळण्यासाठी मदत करावी. vedic-literature ‘अभूतं गोपामिथुना शुभस्पती प्रिया अर्यम्णो दुंर्या अशीमहि।’ त्या घरात तिची स्तुती व्हावी, पुत्र व्हावेत आणि पुष्कळ धन असावे अशीही तिची मागणी आहे. शाश्वती ही तर एक मूर्तिमंत भारतीय स्त्री होती. आपल्या नवऱ्याने केलेल्या पापातून त्याला मोकळे होता यावे म्हणून ती तप करते आणि जेव्हा पापमुक्त होऊन त्याला पुन्हा पूर्ववत आरोग्यसंपन्न शरीराची प्राप्ती होते तेव्हा ती आनंदाने गाते. आपल्या मुला-नातवंडांची इच्छा, ते पराक्रमी आणि संपन्न असावेत अशी अपेक्षा ऋषिकांनी वेदातल्या काही सूक्तांमधून अनेक ठिकाणी केलेली दिसते.
वेदकालीन ब्रह्मवादिनी रोमशा, लोपामुद्रा, इंद्राणी, उर्वशी, अपाला, शाश्वती या ऋषिका त्यांनी रचलेल्या सूक्तातून मोकळेपणाने विविध विषयी बोलताना दिसतात. काम हा देखील आयुष्यातला महत्त्वाचा घटक आहे आणि त्याची योग्य ती पूर्ती व्हावी, अशा अपेक्षांबद्दल या स्त्रिया लिहितात आणि त्यावर मुक्तपणे चर्चा करतांना दिसतात आणि त्यांना वेदांमध्येही समाविष्ट केले जाते यावरून तत्कालिन समाजात हा विषय आणि स्त्रियांनी त्याविषयी बोलणे हे दोन्ही वर्ज्य नसावे असे दिसते आणि वैदिक काळ यासाठी कायमस्वरूपी गौरवशाली वाटतो.
अदिती, विश्ववारा, इंद्रस्नुषा अशा द्रष्टया ऋषिका आहेत. तर सिकता, घोषा, वागाम्मृणी या ब्रह्मवादिनी ऋषिका आहेत. ब्रह्मवादिनी ऋषिका परमात्मा-जीवात्मा, मन-शरीर संबंधी विवेचन करतात. विश्वामित्र-नदी, यम-यमी, सरमा-पणि, पुरुरवा-उर्वशी अशा संवादसूक्तांमधूनही काही ऋषिका भेटतात. vedic-literature यामधील बहुतांश ऋषिकांच्या काव्यातून सुरक्षित घर, सांभाळून ठेवलेले नातेसंबंध आणि पुढची पिढी याचीच त्यांना आस आहे असे दिसते. याबाबतीत त्यांचे विचार स्पष्ट आहेत. त्यांचा दृष्टिकोण निश्चित आहे. एकपत्नी आणि मातृत्वाची देणगी असलेली माता याच स्वरूपात ही प्राचीन वेदवाङ्मयातून आपल्याला दिसून येते.
ऋग्वेदानंतर वैदिक वाङ्मयाच्या पुढच्या कालखंडातील म्हणजे काही शतकांनंतरच्या उपनिषद वाङ्मयात ब्रह्मवादिनी स्त्रियांचा उल्लेख येतो. त्यात ब्रह्मवादिनी गार्गी महत्वाची आहे. ब्रह्मत्व म्हणजे काय याचा शोध घेणारी ही गार्गी वेदाभ्यासात पारंगत आहे. प्रत्यक्ष याज्ञवल्क्य ऋषींना प्रश्न विचारण्याचा धीटपणा आणि धाडस तिच्यात आहे. ब्रह्मतत्त्वाच्या गाभ्यापर्यंत जाणारे सखोल प्रश्न ती भर सभेत विचारते आणि सर्वांना चकित करते. आत्मविद्येचा शोध घेणारा बौद्धिक वादविवाद करण्याची तिची क्षमता अद्वितीय आहे. याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी सुद्धा बुद्धिमान आहे .संसाराचा त्याग करत असताना याज्ञवल्क्य आपल्या मालमत्तेची दोन्ही पत्नींमध्ये वाटणी करतात तेव्हा ती विचारते ‘ह्या संपत्तीमुळे मला आत्मतत्व साध्य होईल काय?’ आणि या प्रश्नाचे उत्तर जेव्हा नाही असे येते तेव्हा वैभवाचा त्याग करत ती थेट म्हणते की मला अमृतत्त्व म्हणजे काय ते सांगा आणि त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची तेही सांगा. बुद्धिमान स्त्रीमधे असलेली तत्त्वज्ञानालाही कवेत घेण्याची कुवत अशा स्त्रियांमधून अधोरेखित होते.
ऋग्वेद काळापासून स्त्रियांनी रचलेली काव्ये, ऋचा उपलब्ध आहेत, गार्गी सारखी असामान्य बुद्धिमत्तेची ब्रह्मवादिनी प्राचीन भारतात होऊन गेली आहे यावरून प्राचीन काळी भारतात स्त्रियांना शिक्षण दिले जात होते. तसे संदर्भही वैदिक वाङ्मयातून मिळतात. मात्र हजारो सूक्तांमध्ये केवळ मोजकी सूक्ते ऋषिकांची आहेत आणि गार्गीसारखी ब्रह्मवादिनी तर एकमेव आहे हे लक्षात घेता, त्याकाळी सर्वसामान्य सर्व स्त्रियांना अध्ययनाचा अधिकार मिळत होता हे अधोरेखित करणारे आहे. दुर्दैवाने मध्ययुगीन काळात विशेषतः मनुस्मृतीनंतर स्त्रियांचे समाजातील स्थान दुय्यम झाले. स्त्रियांना स्वातंत्र्य नसल्याने आणि त्या चारित्र्यहीन असल्याने त्यांच्या शीलाची रक्षा त्यांचा पिता, पती, पुत्र यांनी करावी ही पध्दत रूढ झाली. vedic-literature यातूनच पुढील काळात स्त्रियांवर अनेक बंधने लादली गेली. बहुपत्नीत्व, बालविवाह, सतीप्रथा, पतीच्या निधनानंतर मुंडन करून अलवार नेसून व्रतस्थ राहणे, मुलींना देवाला वाहणे, देवदासी बनवणे अशा प्रथा समाजात निर्माण झाल्या आणि रूढ होत गेल्या.
सुदैवाने कालांतराने समाजसुधारकांच्या प्रयत्नाने आज स्त्रिया शिक्षण घेऊन सर्व क्षेत्र पादाक्रांत करत आहेत. तरीदेखील पुरुषांच्या मनातील पुरुषी वर्चस्वाचा अहंगंड कमी झालेला नाही. त्याचे प्रत्यंतर सार्वजनिक जीवनात स्त्रियांचे लैंगिक शोषण, अवहेलना,बलात्कार करत मारून टाकणे, या स्वरूपात दिसत आहे. आपण वेदांच्या वारसाचा उद्घोष करतो खरा पण त्याप्रमाणे आजच्या स्त्रियांना वैदिक काळातील स्त्रियांचा दर्जा देणे, त्यांचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून योग्य तो सन्मान करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी या वैदिक वाङ्मयातील ब्रह्मवादिनी मांडण्याचा लेखनप्रपंच आहे.
सर्वेश फडणवीस
8668541181