वर्धा,
Accident : नागपूर-वर्धा महामार्गाने नागपूरवरून भरधाव वेगाने येणार्या कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि थेट दुभाजक ओलांडून कार नागपूरकडे जाणार्या कंटेनरवर धडकली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना दत्तपूर शिवारातील हॉटेल द इव्हेंटसमोर शुक्रवार २६ रोजी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

नागपूर-यवतमाळ महामार्गाने नागपूरकडून वर्धा शहराकडे एम. एच. ३२ ए. एस. ८९३८ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने ठाकूर कुटुंब नागपूरला गेले होते. भरधाव वेगाने येत असताना कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अचानक कार अनियंत्रित झाली. कार दुभाजकावर चढून रस्त्याच्या दुसर्या बाजूला गेली व नागपूरकडे जाणार्या एन. एल. ०१ ए. जी. ०९८८ या कंटेनरवर जोरदार धडकली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारमधील कमलाबाई शंकरसिंग ठाकूर (८५), गजानन तिडके (४६) दोघेही राहणार मालगुजारीपुरा वर्धा या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अनुप्रिया राजेशसिंग ठाकूर (४८), अवंतिका राजेशसिंग ठाकूर (२१) व चालक दीपक तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित रुग्णवाहिकेतून सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. नंतर अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. मागील चार महिन्यांपूर्वी राजेश ठाकूर यांचे निधन झाले होते. आता या घटनेमुळे त्यांच्या आईचा जागीच मृत्यू, पत्नी व मुलगी गंभीर तर परिवारातील सदस्य म्हणून असलेल्या गजाननचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.