ठाेस पुरावे असल्याने काैटुंबिक छळाचा खटला रद्द करता येणार नाही

- उच्च न्यायालयाचा पती, सासूला दणका

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
Domestic Violence : लग्न झाल्यानंतर पती आणि सासूने सुनेचा शारीरिक व मानसिक छळ करुन तिला माहेरुन हुंडा आणण्यासाठी दबाव टाकला. तिने माहेरुन पैसे आणण्यास नकार दिल्यामुळे सुनेला मारहाण करुन घराबाहेर काढले. या प्रकरणात पती, सासू-सासरे, ननंद व नंदेचा पती यांच्याविरुद्ध काैटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. मात्र, सासरच्या मंडळीने उच्च न्यायालयात धाव घेऊन खटला रद्द करण्याची मागणी केली हाेती. ‘पती आणि सासूविरुद्ध ठाेस पुरावे असल्यामुळे त्यांच्यावरील खटला रद्द करता येणार नाही.’ असे निरीक्षण नाेंदवून त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या. न्यायमूरती उर्मिला जाेशी-फलके व न्या. नंदेश देशपांडे यांनी हा निर्णय दिला. अभिनय साेनी व ममता साेनी, असे दणका बसलेल्या पती व सासूचे नाव असून ते मध्य प्रदेशमधील रहिवासी आहेत.
 
 
 
domestic
 
 
 
अभिनय साेनी याचे 11 जुलै 2024 राेजी कुटुंबियांच्या सहमतीने नागपुरातील मानकापूर परिसरात राहणाऱ्याया एका उच्च शिक्षित तरुणीशी लग्न झाले हाेते. लग्नाच्या दाेन महिन्यांपर्यंत दाेघांचा सुखी संसार सुरु हाेता. मात्र, त्यानंतर सासू आणि सासऱ्यांनी सुनेला माहेरुन हुंडा आणण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे तिने आपल्या पतीला ही बाब सांगितली. पतीनेसुद्धा आई-वडिलांची बाजू घेऊन माहेरुन पैसे आणण्यासाठी दबाव टाकला. मात्र, तिने आई वडिलांची आर्थिक स्थिती कमजाेर असल्यामुळे पैसे आणण्यास नकार दिला. त्यामुळे अभिनव तिला शिविगाळ आणि मारहाण करायला लागला.
 
 
तसेच काही दिवसांतच तिची ननंद ही पतीसह घरी आली असता त्या दाेघांनीही महिलेला हुंडा न आणल्यास घरातून काढून देण्याची भाषा वापरली. त्यानंतर आराेपींनी हुंड्यासाठी शारीरिक-मानसिक छळ करायला सुरुवात केली. पती आणि सासूने अक्षरक्षः तिला घराबाहेर मारहाण केली. तसेच, त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही म्हणून विवाहितेला घरातून बाहेर काढण्यात आले, अशी तक्रार आहे. घरातून बाहेर काढल्यानंतर ती थेट माहेरी गेली. तिच्या आईवडिलांनी लग्न टिकावे म्हणून अभिनव आणि सासरच्या मंडळींची मनधरणी केली. मात्र, ते मानायला तयार नव्हते. त्यांनी हुंडा आणल्यास मुलगी पाठवा, अन्यथा आपल्याच घरी ठेवा आणि मुलाचे दुसरे लग्न लावून देऊ, अशी धमकी दिली. त्यामुळे महिलेने मानकापूर पाेलिस ठाण्यात मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार दिली. तक्रारीनुसार, पती, सासू-सासरे, ननंद व तिचा पतीविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.
 
 
पती व सासूची न्यायालयात धाव
 
 
गुन्हा दाखल झाल्यानंतर पती अभिनव आणि सासू ममता साेनी यांच्यासह सर्वांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन एफआयआर आणि खटला रद्द करण्याची याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीदरम्यान, विवाहितेचे वकील अ‍ॅड. साैरभ राऊत यांनी पती व सासूवरील गंभीर आणि ठाेस स्वरूपाच्या आराेपांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. उच्च न्यायालयाने विवाहितेच्या आराेपात तत्थ्य गुणवत्ता आढळून आल्यामुळे पती व सासूची याचिका फेटाळून लावली. अन्य तीन आराेपींवर सामान्य व माेघम स्वरूपाचे आराेप असल्याची बाब लक्षात घेता त्यांच्याविरुद्धचा एफआयआर व खटला रद्द केला. मात्र, ठाेस पुरावे असल्यामुळे गुन्हा रद्द करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने निरीक्षण नाेंदवले.