वन्यप्राण्यांची शिकार करुन मांसाची विक्री करणार्‍या 7 जणांना अटक

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
धानोरा, 
Wild Animal Hunting : मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वन्यप्राण्यांची शिकार करुन मांसाची विक्री करणार्‍या 7 व्यक्तींना अटक करुन त्यांच्यावर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. विलास वासुदेव उईके रा. लांगटोला (धानोरा), किरपालसिंग भगतसिंग डांगी रा. पेटतुकुम, ता. आरमोरी, किशोरा बाबुराव हलामी, महेश भिमराव पावे, प्रकाश आनंदराव वाघाडे, रमेश रामसिंग मडावी चौघेही रा. धानोरा व सुनिल रुषी गावडे रा. पवनी अशी अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत.
 

jk 
 
 
 
सविस्तर वृत्त असे की, 26 सप्टेंबर रोजी दक्षिण धानोराचे क्षेत्र सहाय्यक एस. डी. पुरमशेट्टीवार यांना वन्यप्राण्याची शिकार करुन मांसाची विक्री करण्यात येत असल्याची गुप्त माहीती प्राप्त झाली. त्यानुसार वनपरिक्षेत्र दक्षिण व उत्तर धानोराच्या वनकर्मचार्‍यांनी विलास वासुदेव उईके रा. लांगटोला (धानोरा) यांच्या घराची झडती घेतली. झडतीमध्ये घराच्या बाजुच्या पाणी असलेल्या खड्यामध्ये नॉयलान बारदानामध्ये प्लॉस्टिक पिशवित वन्यप्राण्यांचे मांस ठेवलेले आढळले. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी चौकशी करुन विलास उईके, किरपालसिंग डांगी, किशोरा हलामी, महेश पावे, प्रकाश वाघाडे, सुनिल गावडे, रमेश मडावी यांस अटक करुन मोका पंचनामा नोंदवुन वनगुन्हा नोंदविण्यात आला. सदर आरोपींविरुध्द भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) (आय) व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 कलम 9, 39, 44, 48, 51, 57 महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे कलम 9 ब क इ अन्वये कार्यवाही करण्यात आली.
 
 
पुढील चौकशी गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार, गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक आर्या व्हि. एस. व गडचिरोली वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक (जकास) अंबरलाल काशिराम मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण धानोराचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित पुरमशेट्टीवार, क्षेत्र सहायक गांगरेड्डीवार, हितेश मडावी, मिलिंद कोडप, सिमा सिडाम, लिना गेडाम, भुमा सय्याम, वनरक्षक किरण रामटेके व वनपरिक्षेत्र उत्तर व दक्षिण धानोरा येथील वनकर्मचारी करीत आहेत.