गोंदिया,
Gondia-Rain : शहरासह जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून पाऊस धुमाकूळ घालत आहे. या पावसाचा अधिक व मध्यम कालावधीच्या धानाला फायदा असला तरी कमी कालावधीच्या धानाला चांगलाच फटका बसला आहे. अर्जुनी मोर तालुक्यात अनेक भागांत झालेल्या वादळी पावसाने उभे धान पीक अक्षरशः आडवे झाले आहे. धान उत्पादकांनी त्यांची व्यथा लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे मांडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
यंदाचा पावसाळा संपायला अवघे तीन दिवस शिल्लक असताना जिल्ह्यात परतीचा पाऊस धूमाकूळ घालत आहे. यंदा पावसाने सुरवातीला शेतकर्यांना चांगले रडकुंडीस आणले. जून कोरडा गेल्यावर जुलैमध्ये जोरदार हजेरी लावली. जूनमध्ये सरासरीच्या केवळ ५८ टक्के, जुलैमध्ये १४४ टक्के, ऑगस्टमध्ये ६८ टक्केच पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये पावसाची सरासरी १२५.३ टक्के आहे. जून ते आजपर्यंत सरासरीच्या ११८४.९ मिमी म्हणजेच ९८.७ टक्के पर्जन्यवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात निर्धारीत लागवड क्षेत्राच्या १.९० लाख हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने कमी, मध्यम व अधिक कालावधीच्या धानाचे पीक घेतात. कमी कालावधीचे पीक परिपक्वतेच्या अवस्थेत, मध्यम कालावधीचे ओंबी टाकण्याच्या तर अधिक कालावधीचे पीक गर्भावस्थेत आहे. काही भागांत हलके धान कापणीस आले आहे. मात्र गत दोनतीन दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. अनेक भागात झालेल्या वादळी पावसाचा या धानाला फटका बसला आहे. अक्षरशः उभे पीक आडवे झाले आहे. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावत असल्याने शेतकरी मेटाकूटीस आला आहे. जिल्ह्यात पुढील तीन दिवस पाऊस ठाण मांडून राहणार आहे. यामूळे शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
देवरी तालुक्यात अतिवृष्टी
जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. याचा फटका धान पिकाला बसतो आहे. आज २७ रोजी देवरी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. तालुक्यात ६७.४ मिमी पाऊस नोंदला गेला. सिंदीबिहरी, चिचगड महसूल मंडळात ७८ मिमी तर देवरी मंडळात ८३.३ मिमी पाऊस बरसला. आमगाव तालुक्यात ४७.७ मिमी, गोरेगाव ४७.२ मिमी, सालेकसा ४६.४ मिमी, गोंदिया ३५.४ मिमी, तिरोडा ३० मिमी, अर्जुनी मोर ३५.९ मिमी आणि सडक अर्जुनी तालुक्यात ३६ मिमी असा सरासरी जिल्ह्यात ४२.३ मिमी पाऊस आज नोंदल गेला. या पावसाचा फटका पीके, जिर्ण व कच्च्या मातींच्या घरांना बसला आहे. अनेकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
आजपर्यत झालेल्या पावसाची तालुकानिहाय टक्केवारी
तालुका टक्केवारी
गोंदिया १०३.३
आमगाव ८१.२
तिरोडा ७६
गोरेगाव ११३.७
सालेकसा ९५.४
देवरी १०६
अर्जुनी मोर १०९.३
सडक अर्जुनी ८८.२
एकूण ९८.७