गोंदिया,
gondia-rice-deal-case : आमगाव येथील व्यापारी विरेंद्रकुमार लिल्हारे यांनी २४ सप्टेंबर रोजी तांदूळ खरेदी सौद्यात आपली १ कोटी रूपयाने फसवणूक झाल्याची तक्रार शहर पोलिसात नोंदविली होती. दरम्यान तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीमुळे समाजात आपली बदनामी होऊ नये, यासाठी तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीवरून घुमजाव करीत काळापैसा दुप्पट करण्याचा सौदा आरोपींशी झाल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून ७ लाख ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विरेंद्रकुमार लिल्हारे यांचा आरोपी दिप्ती मिश्रा रा. गोंदिया, रामेश्वर धुर्वे व हेमलता बैस दोन्ही रा. छिंदवाडा विश्वास संपादन करून १ कोटी रूपयांत १० कंटेनर तांदूळ देण्याचा सौंदा केला. त्यानुसार २३ सप्टेंबर रोजी गोंदिया येथे विरेंद्रकुमार लिल्हारे यांनी दिप्ती मिश्रा, रामेश्वर बैस व हेमलता बैस यांना १ कोटी रूपये दिले. त्यांनी ते पैसे तेथेच ऑटोत बसलेल्या आरोपी महेंद्रसिंह मल्होत्रा व अन्य एका व्यक्तीला दिले. त्यानंतर काही काळ लोटल्यावरही तांदूळ न पोहचल्याने तसेच आरोपींचे फोनही लागत नसल्याने विरेंद्रकुमार लिल्हारे यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करण्यासाठी वेगवेगळी पथके नेमली.
तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार, १० कंटेनर तांदळासाठी एक कोटी रूपयांचा सौंदाबाबत ताळमेळ बसत नसल्याने पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपास सुरू केला. त्यानंतर दोन दिवसांनी विरेंद्रकुमार लिल्हारे यांना आरोपींनी दिलेल्या पैशाच्या ट्रॉली बॅग मध्ये चाईल बँकेच्या नोटा व त्याखाली रद्दी पेपर असल्याचे समजले तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात येतातच व समाजात आपली बदनामी होऊ नये यासाठी तो व्यवहार तांदळाचा नाही तर काळापैसा दुप्पट करण्याचा असल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यामुळे या प्रकरणात आणखी किती जणांची फसवणूक झाली यादिशेने पोलिस अधिक तपास करीत आहेत.
अटकेतील आरोपी
याप्रकरणी पोलिसांनी रामेश्वर धुर्वे (४५), इशान नायर (२३), अजय धुर्वे (२४), अमित करोसिया (३९), सौरभ डोहले (२४), हेमंलता बैस (४४) सर्व रा. छिंदवाडा यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक फोर्ट इकोस्पोर्ट गाडी व चाईल बँकेच्या नोटा असलेली बॅग असा ७ लाख ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पुढील तपासासाठी वेगवेगळ्या दिशेने पोलिस पथके रवाना करण्यात आली आहे.