चंद्रपूर,
heavy-rain-chandrapur : मागील चार दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र कमीअधीक प्रमाणात संततधार पाऊस सुरू आहे. शनिवार, 27 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास महानगरात जोरदार पावसाने हजेरी लावली. तासभर धो-धो बरसलेल्या या पावसामुळे महानगरातील मार्ग जलमय झाले. या मार्गावरून वाहन काढताना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
शनिवारी महानगरात सकाळपासून अधूनमधून रिमझीम सुरू असलेल्या पावसाने दुपारच्या सुमारास मात्र जोर पकडला. तासभर जोरदार पाऊस पडला. या पावसाने सखल परिसर व महानगरातील मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सततच्या पावसामुळे महानगरातील कस्तुरबा मार्ग, गांधी मार्ग, बंगाली कॅम्प, तुकूम मार्ग यासह सर्वच मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहे. या पाणी साचलेल्या खड्डेमय मार्गावरून वाहन काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. त्यानंतर रात्रीपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.
तर, शुक्रवारी रात्रभर सावली, मूल, पोंभुर्णा, चिमूर, भद्रावती तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सावली तालुक्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका कापूस पिकाला बसला आहे. कापसाला फुले येण्यास सुरुवात झाली आहे, मात्र जड धान पिकाला याचा फायदा आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिक घेतले जाते. यंदा तालुक्यात 26 हजार हेक्टर वर धान, तर 800 हेटक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. तर पोंभुर्णा तालुक्यात सततच्या पावसामुळे सोयाबीन, कापासासह भाजीपाला या पिकांना मोठा फटका बसला. सततच्या पावसामुळे पिकांवर रोगराईचा प्रादूर्भाव झाला असून, शेतकरी संकटात सापडला आहे.
मागील 24 तासात जिल्ह्यात 30.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 57.8 मिमी पाऊस सावली तालुक्यात पडला. तर मूल तालुक्यात 46.5 मिमी, पोंभुर्णा 42.8 मिमी, चिमूर 38.2 मिमी, ब्रम्हपुरी 33.6 मिमी, वरोडा 28.4 मिमी, सिदेंवाही 26.4 मिमी, नागभीड 25.7 मिमी, भद्रावती 23.3 मिमी, गोंडपिपरी 20.8 मिमी, बल्लारपूर 17 मिमी, कोरपना 16.4 मिमी, चंद्रपूर 15.1 मिमी, तर जिवती तालुकत 11.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.