कारंजा तालुक्याला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले

पिके पाण्याखाली

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
कारंजा लाड, 
Heavy Rain : कारंजा शहरासह संपूर्ण तालुका मागील दोन महिन्यांपासून पावसाने अक्षरशः झोडपला जात आहे. अखंड कोसळणार्‍या या पावसाने २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी आणि रात्री तसेच २७ सप्टेंबरला दुपारी पुन्हा जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते नाल्यांचे रूप धारण करून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली, तर ग्रामीण भागातील पिके पुन्हा पाण्याखाली गेली.
 
 
 
kl;
 
 
 
कामरगाव, धनज, गिर्डा, पिंपळगाव, एकलारा यांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कारंजा शहरातील अनेक भाग जलमय झाले. रस्ते नदीसारखे वाहू लागले, घरांच्या अंगणात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. सलग दोन महिन्यांपासून कोसळणार्‍या पावसाने पायाभूत सुविधांची दुरवस्था अधिकच उघड केली आहे. तर ग्रामीण भागात शेतकर्‍यांची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. सोयाबीन, तूर, कापूस, यासह इतर खरीप पिके पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात कुजण्याचा धोका आहे. सध्याच्या शासकीय नियमांनुसार २४ तासांत ६५ मिमी पावसाची नोंद झाल्यासच अतिवृष्टीची नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. मात्र, तालुयात गेले दोन महिने सतत होणार्‍या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे टप्प्याटप्प्याने नुकसान झाले आहे.
 
 
निकषाचा हवाला देऊन मदत रोखण्याऐवजी शासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करावा. दोन महिन्यांच्या सततच्या पावसामुळे झालेल्या हानीसाठी स्वतंत्र धोरण आखून त्वरित आर्थिक मदत दिली नाही, तर शेतकरी मोठ्या संकटात सापडतील. कारंजा तालुयातील सततचा पाऊस, उध्वस्त शेती आणि नागरिकांचे ढासळलेले जनजीवन या सर्वांनी मिळून शासनासमोर गंभीर आव्हान उभे केले आहे. या परिस्थितीत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकर्‍यांना दिलासा देणे अत्यावश्यक आहे.
 
 
कारंजा तालुयात मागील दोन महिन्यापासून पावसाने रौद्ररूप दाखविल्याने पिके पाण्याखाली गेले. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. परिणामस्वरूप आता जगायचे कसे? असा प्रश्न शेतकर्‍यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी जगवायचा असेल तर अतिवृष्टीचा निकष बाजूला ठेऊन सरसकट मदत द्यावी.अशी मागणी शेतकरी करीत आहेत.