घरात ‘माता’ वृद्धाश्रमात

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
 
वेध

mother old age home नवरात्रीचा उत्सव अंगणात, मंदिरात, गावोगाव रंगात आला आहे. आराधना, उपास, जागरण, भजन, दांडिया, गरबा, आरत्यांमध्ये दंग होत आहे. पण, या नऊ दिवसांच्या बाह्य भक्तीत घराच्या चार भिंतीत जे घडतं, त्याचा आवाज बहुतेक वेळा कुणालाच ऐकू येत नाही. देवीचे नाव जपणारे, तिची कृपा मागणारे हात एकीकडे आणि त्याच घरात आई, बहीण, पत्नी यांच्यावर दररोज शब्दांचे घाव होतात. एरवी सकाळपासून आई-बहिणींच्या शिव्या देणाऱ्यांची सकाळ आता देवीच्या भक्तीने सुरू होत आहे. नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा गौरव. दुर्गा हीच आदिशक्ती, तिच्या शक्तीशिवाय विश्वाचं संतुलन अशक्य असल्याचं माहिती असतानाही समाज स्वतःच्या घरातल्या आईची, बहिणीची, पत्नीची शक्ती ओळखत नाही. घरासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्त्रीकडे आदराने पाहण्याऐवजी तिच्या हक्कांवर गदा आणली जाते. तिच्यावर हात उगारला जातो. देवी वैभवांचं प्रतीक आहे. ती आदिशक्ती, आदिमाता आहे. परंतु, घरात तिला दुय्यम स्थान दिले जाते. तिचं ऐकून घेतल्या जात नाही. पत्नीला घालूनपाडून बोलले जाते. बहिणीला संपत्तीतून बेदखल केले जाते. मंदिरात देवीसमोर डोळ्यात पाणी आणणारे, आरतीच्या शेवटी जयघोष करणारे पुरुषच घरातल्या स्त्रीला अपमानित करतात; याला आपली दांभिकता म्हणावी लागेल.

 

old age home  
 
 
याला काही अपवादही आहेत. काळ बदलतोय, अशा घटना अजूनही कायम आहेत; किंबहुना त्यात वाढ होते आहे. शब्दांचे घाव, दुर्लक्ष आणि सततची उपेक्षा याने थकलेली आई एक दिवस घराचा उंबरठा ओलांडते. वृद्धाश्रमाचा आसरा घेते. तिनेच लाडात वाढवलेली मुलं तिचा शोधही घेत नाहीत. कारण ती त्यांच्यासाठी स्वयंपाकापुरतीच मर्यादित असते. आईला वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्यातली माणुसकी मेलेले असते. हा समाजावर मोठा धब्बा म्हणावा लागेल. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा होते. या नऊ दिवसांच्या पलीकडे 356 दिवस आपल्या समाजात खऱ्या स्त्रीशक्तीचा आदर किती केला जातो? महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर अंगावर काटा येतो. एका अहवालानुसार देशात दररोज सरासरी 90 पेक्षा जास्त बलात्कार नोंदविले जातात. यामध्ये कौटुंबिक हिंसा, लैंगिक छळ, हुंडाबळी, नोकरीच्या ठिकाणी होणारा छळ, अपहरण, बलात्कार आणि सायबर शोषण या घटना वेगळ्याच. हे फक्त नोंदविलेले गुन्हे आहेत. नोंद न होणाऱ्या घटना यापेक्षा कितीतरी पट जास्त आहेत. नवरात्राच्या पूर्वसंध्येला वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार व्हावा हे एक वाणगीदाखल उदाहरण असले, तरी देशात नवरात्रात अशी किती उदाहरणं असतील. आई म्हणून ती घराचा कणा, पत्नी संसार उभा करते, बहीण पाठबळ देते, मुलगी मायेचे आभाळ पसरवते. पण, तीच बहुतेक वेळा सन्मानापासून दूर असते. खरं तर तिला सन्मान नको असतो, तिला हवं असतं कोणीतरी आपलं म्हणणारं. परंतु, तिच्या नशिबी तेही नसतं.mother old age home नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचे प्रतीक. घरोघरी उत्साह असतो. पण, याच काळात घरच्या आईला दररोज होणारी शिवीगाळ, पत्नीस मारहाण हा विरोधाभास समाजात पाहायला मिळतो. सध्या नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या देवीला नेसवण्याची प्रथा सुरू झाली आहे. देवीला साडी नेसवताना घरातल्या पत्नीला म्हणा वा आईला उपाशी राहावे लागत असेल तर देवीला साडी नेसवण्यात काय अर्थ? एका बाजूला शक्तीला नमस्कार आणि दुसऱ्या बाजूला तिला दुर्बल समजून तिच्यावर पती आणि मुलांचा अत्याचार हा समाजावर मोठा डाग आहे. आई, पत्नी, बहीण, मुलगी या सर्व भूमिकांमध्ये असलेली स्त्री जिवंत देवीच आहे. तिच्या सन्मानाला धोका म्हणजे समाजाला धोकाच. आई, पत्नी, बहीण, मुलगी या सर्व रूपांमध्ये असलेली स्त्री जिवंत देवी आहे. देवीला शक्ती म्हणायचे आणि घरातल्या स्त्रीला दुर्बल समजायचे. ज्या हाताने मंडपातल्या देवीला लाखो रुपये दिले जातात, त्याच हाताने आई, पत्नीला मारणारे नव्हे जिवंत मारणारेही याच समाजात आहेत. मंडपातल्या देवीच्या मूर्तीची दरवर्षी स्थापना होईल. पण, घराघरातील जिवंत देवतांचं मूक रडणं कायमच दडपलेलं राहील. नवरात्र संपल्यावर ‘पुनरागमनाएच’ म्हणत देवीला पुन्हा येण्याचं निमंत्रण दिले जाईल. पण, घरातील स्त्रीवरील अत्याचार कधी थांबेल. ज्या दिवशी प्रत्येक घरातल्या देवीरूपी आई-बहिणीच्या डोळ्याच्या कडा ओल्या होणार नाहीत, आई-बहीण-पत्नीला घराबाहेर पडावेसे वाटणार नाही तेव्हाच नवरात्र साध्य होईल. घरातल्या आईला सांभाळा. मंदिरातील आईचा हात कायम डोक्यावर राहील.
 
प्रफुल्ल क. व्यास
9881903765
...............................