मूल,
Murder through financial transactions : उसनवार घेतलेले 6 लाख रूपये देण्यास नकार दिल्याने एका युवकाने सेवानिवृत्त केंद्र प्रमुखाची हत्या केली. ही घटना मूल पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवार, 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हत्या करणार्या युवकाला पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. सुनील कालीदास गेडाम (60, रा. टेकाडी) असे मृतकाचे नाव आहे.
आरोपी किस्मत मोहम्मद अल्ली सय्यद (24, रा. टेकाडी) व सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सुनील गेडाम हे सावली मार्गावरील रानसंपन्न हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी शुक्रवारी रात्री 7 वाजता दरम्यान गेले होते. जेवण करून मूलकडे परतत असताना आरोपी किस्मत अली हा महत्वाचे काम आहे, असे सांगून सुनील गेडाम यांना टेकाडीला घेवून गेला. रात्री 8.30 वाजता दरम्यान टेकाडीवरून एमआयडीसी मार्गाने मूलकडे येत असताना किस्मत सय्यद यांनी उसनवार घेतलेली रक्कम देण्यास नकार देत असल्याचे कारणावरून काही मित्रांच्या मदतीने सुनील गेडाम यांच डोक्यावार लोखंडी सळाखीने वार करून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मरेगाव-टेकाडी मार्गावरील नाल्यात मृतदेह फेकला.
दरम्यान, सुनील गेडाम हे उशीर होवूनही घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. गेडाम याला घरून बोलावून नेणार्या किस्मत अली याच्यावर शंका आल्याने मुलगा पंकज गेडाम याने मूल पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदवली. दरम्यान आकापूर जवळील वळण मार्गावर सुनील गेडाम यांची पल्सर दुचाकी (एम 34 एएक्स 8323) भ्रमणध्वनी, चष्मा आणि चप्पल दिसत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी संशयीत म्हणून किस्मत मोहम्मद सय्यद अली याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने सुनील गेडाम यांनी उसनवार घेतलेले 6 लाख रूपये देण्यास नकार दिल्याने त्यांची हत्या केल्याचे मान्य करून मृतदेह लपविल्याचे ठिकाणही पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठुन ‘फाँरेन्सीक’ चमूच्या सहकार्याने प्रारंभीक चौकशी करून मृतदेह मूल उपजिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
मूल पोलिस ठाण्यात आरोपी किस्मत अली याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजित आमले, पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहे. घटनेतील आरोपीचा गुरे खरेदी, विक्रीचा व्यवसाय असल्याने या प्रकरणात पुन्हा काही जणांचा सहभाग असल्याचे बोलल्या जात आहे.