वर्धा,
navratri-2025 : नवरात्र आले की गरबा आला आणि गरबा म्हटले की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर येतो. काही संघटनांचा त्याला विरोधही असतो. परंतु, ९ दिवस सर्वत्र दांडियाचा माहोल असतो. दांडिया खेळणारे आणि पाहणार्यांची मोठी गर्दी होते. यावेळी नवरात्राचे औचित्य साधून जागर फाऊंडेशन आणि क्रीडा भारतीच्या वतीने अभिनव संकल्पना राबवत युवतींकरिता लाठीकाठी प्रशिक्षणाचे आयोजन केलेे. शहरात आता दांडियासोबतच लाठीकाठीचीही चर्चा रंगू लागली आहे.

वर्धेत जवळपास एक दीड महिन्यांपासुन विविध मंडळांच्या वतीने गरबा, दांडिया प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी बाहेरून कोरिओग्राफरलाही आयात करण्यात आलेे. नवरात्रोत्सवाला सुरुवात होताच गरब्यालाही सुरुवात झाली. दुर्गादेवी मंडळांसह शैक्षणिक संस्थांमध्येही द्विदिवसीय गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तर काही महिलांनी एकत्र येत मंगल कार्यालयांमध्ये, सोसायटींमध्ये दांडियाचे आयोजन करण्यात आले. युवतींसोबतच युवकांमध्येही दांडियाची ओढ दिसुन येते. दरम्यान, युवतींना स्वसंरक्षण करता यावे यासाठी क्रीडा भारतीच्या मदतीने श्रेया देशमुख यांच्या नेतृत्वात जागर फाऊंडेशनच्या वतीने केसरीमल कन्या शाळेच्या खुल्या पटांगणावर पाच दिवसांचे लाठीकाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
समाज व्यवस्थेत युवतींवर होणारे हल्ले वा तिच्यासोबत होणार्या गैरवर्तनुकीला आळा घालण्यासाठी प्रत्येक युवती सक्षम व्हावी यासाठी तलवारबाजी, लाठीकाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाला युवतींचा कसा प्रतिसाद मिळतो याविषयी आयोजकांमध्ये शंका होती. परंतु, स्व संरक्षणाची गरज लक्षात घेता तलवारबाजी आणि लाठी काठी प्रशिक्षणाला युवतीच नव्हे तर महिलांनीही हजेरी लावली. पहिल्या दिवशी लाठीकाठीची माहिती समजून घेतल्यानंतर दुसर्या दिवशी महिलांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. पाच दिवसाच्या प्रशिक्षणात महिला संपुर्ण प्रशिक्षित होऊन स्वसंरक्षण करतील, असा विश्वास श्रेया देशमुख यांनी व्यत केला.
गरबा हा संस्कृतीचा एक भाग आहे. देवीच्या आराधनेसोबत मनोरंजन होते. परंतु, लाठीकाठीच्या माध्यमातून प्रत्येक युवतीचे संरक्षण होऊ शकते. अशा प्रशिक्षणांची आज आवश्यकता आहे. दरवर्षी वर्धेतच नव्हे तर सर्वत्र लाठीकाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन व्हावे. या प्रशिक्षणात आपल्याला स्वावलंबनाचे धडे मिळाले असुन आत्मविश्वास निर्माण झाला असल्याची प्रतिक्रिया अभियंता असलेल्या सुरभी भुतडा यांनी सांगितले. या प्रशिक्षण शिबिरात शहरातील विविध वयोगटातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला आहे. शुक्रवारी भर पावसातही युवतींनी लाठीकाठीचे प्रशिक्षण घेतले हे उल्लेखनिय.