अहिल्यानगर,
Laxman Hake अहिल्यानगर, महाराष्ट्रातील आरक्षणाचा वाद चिघळत असतानाच ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलनातून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. सोशल मीडियावर टाकलेल्या एका भावनिक पोस्टनंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. हाके यांनी ओबीसी आरक्षणासाठी सातत्याने लढा दिला असला तरी आता त्यांनी या लढ्यापासून दूर जाण्याची तयारी दाखवली आहे.
लक्ष्मण हाके यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी प्रामाणिकपणे ओबीसी समाजासाठी लढलो. भटके-धनगर समाजाला जोडत गेलो, लाखो माणसं एकत्र केली. परंतु त्याचसोबत शत्रूही निर्माण झाले, हल्ले सहन केले. आता मात्र सहन होत नाही.” या शब्दांत त्यांनी आंदोलन थांबवण्याच्या दिशेने स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या या पोस्टने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता आणि संभ्रम निर्माण केला आहे.हाके यांनी जाहीर केलं आहे की, २७ सप्टेंबरनंतर दैत्यानांदूर (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथे होणाऱ्या ओबीसी मेळाव्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट केली जाईल. आंदोलन सुरू ठेवायचं की त्यातून माघार घ्यायची, याबाबतचा अंतिम निर्णय या मेळाव्यानंतर घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी लिहिले आहे की, “मी बॅनर लावू शकलो नाही, मोठं स्टेज उभारू शकलो नाही, पण तुम्ही माझ्या पाठीशी ताकदीने उभे राहिलात. आता आंदोलनात असेन किंवा नसेन, तरी तुमच्या पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.”मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजात असलेला असंतोष लक्षात घेता, हाके यांच्या आंदोलनाचा आवाज महत्त्वाचा ठरला आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे हाके यांच्यात यापूर्वी अनेकदा संघर्षाची ठिणगी उडाली होती. दोघांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवत आपापल्या समाजाच्या हक्कासाठी कठोर भूमिका घेतली होती.
हाके जर आंदोलनातून माघार घेतल्यास, ओबीसी चळवळीच्या गतीवर आणि राज्यातील आरक्षणाच्या संघर्षाच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यांचा पुढील निर्णय ओबीसी समाजाची दिशा आणि राजकीय भाकित दोन्ही ठरवणारा ठरू शकतो.राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेली अस्थिरता लक्षात घेता, हाके यांच्या या भूमिकेने राजकीय समीकरणांमध्ये नव्याने घडामोडी घडवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.