पंजाब पोलिसांची मोठी यशस्वी कारवाई

अबूधाबीहून बब्बर खालसा दहशतवादी पिंदी भारतात आणला

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
चंदीगड,
babbar khalsa खालिस्तानी दहशतवादी नेटवर्कविरोधात मोठी कारवाई करत, पंजाब पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांच्या सहकार्याने बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या खालिस्तान समर्थक दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रमुख दहशतवादी परमिंदर सिंह उर्फ पिंदी याला अबूधाबीहून भारतात यशस्वीरित्या प्रत्यर्पित केले आहे. या कारवाईमुळे पंजाबमधील दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीविरोधात मोठा आघात मानला जात आहे.
 

punjab-police-babbar khalsa-terrorist-extradition-india 
परमिंदर सिंह उर्फ पिंदी हा पाकिस्तानमध्ये लपून बसलेला खालिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह उर्फ रिंदा आणि हैप्पी पासिया यांच्या गँगचा जवळचा सहयोगी असल्याचे समोर आले आहे. पिंदीवर पंजाबमध्ये पेट्रोल बम हल्ले, खंडणी, हिंसक कारवाया आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे आरोप आहेत. त्याच्या अटकेमुळे पंजाब पोलिसांना एक अत्यंत वांछित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे.पंजाब पोलिसांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय विशेष पथकाने २४ सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) जाऊन परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने आणि यूएई अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या. या प्रक्रियेनंतर पिंदीला भारतात परत आणण्यात आले. याप्रकरणी पंजाब पोलिसांचे महासंचालक (DGP) गौरव यादव यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना या यशस्वी कारवाईचे श्रेय केंद्र सरकारच्या विविध एजन्सी, परराष्ट्र मंत्रालय आणि यूएई सरकारच्या सहकार्याला दिले आहे.
 
 
डीजीपी गौरव यादव यांनी म्हटले की, “ही कारवाई पंजाब पोलिसांच्या दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीविरोधातील ‘शून्य सहनशीलता’ धोरणाचे प्रतीक आहे. ही यशस्वी प्रत्यर्पण प्रक्रिया पोलिस दलाच्या प्रगत तपास क्षमतेचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या पोहोचाचे द्योतक आहे.”बटाला परिसरात घडलेल्या पेट्रोल बम हल्ले आणि इतर गंभीर गुन्ह्यांमुळे पिंदीविरोधात रेड कॉर्नर नोटिस (RCN) जारी करण्यात आली होती. यावर तातडीने कारवाई करत पंजाब पोलिसांनी त्याला न्यायाच्या कक्षेत आणले आहे. या कारवाईमुळे केवळ पंजाबच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे.
 
 
पिंदीच्या अटकेमुळे BKI आणि त्यांच्याशी संबंधित इतर खालिस्तानी नेटवर्कवर दबाव वाढण्याची शक्यता असून, ही कारवाई आगामी काळात अशा दहशतवादी कारवायांविरोधात निर्णायक ठरू शकते. पंजाब पोलिसांच्या या कृतीचे विविध स्तरांवरून कौतुक होत आहे.