अबब... काँग्रेसचे बारा वाजले गं बाई

पुण्यात काँग्रेसला आणखी एक धक्का

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
पुणे,
Rohan Surawase Patil आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय मोर्चेबांधणीला गती दिली आहे. त्याचाच परिणाम म्हणून पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
 
 
Rohan Surawase Patil
संपन्न झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन बळकट करून जनतेसाठी प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले.रोहन सुरवसे पाटील यांनी काँग्रेसमध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत असताना पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे कार्याला संधी न मिळाल्याचे सांगत काँग्रेसला रामराम ठोकला. त्यांच्या म्हणण्यानुसार, युवकांना न्याय मिळण्यासाठी संघर्षाची गरज असून, राष्ट्रवादीत त्यांना हवी तशी संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याआधीही काँग्रेसचे तीन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्ष संघटनेला मोठा धक्का बसला होता. आता युवक नेत्यांचाही ओघ दुसऱ्या पक्षांकडे वळू लागल्याने पुण्यातील काँग्रेस संघटनेची ताकद आणखी ढासळत असल्याचे चित्र दिसत आहे.
 
 
कसबा पेठ मतदार संघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळीही त्यांनी काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत मतभेदांमुळे कार्य अडचणीत येत असल्याचा आरोप केला होता.राजकीय दृष्टिकोनातून पाहता, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चेबांधणी प्रभावीपणे सुरू असून, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा संघटनात्मक बळ प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसच्या नेतृत्वपद्धतीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.