रायपूर,
Roof collapses at Raipur Steel Plant छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यातील सिलातारा परिसरात असलेल्या गोदावरी स्टील प्लांटमध्ये शुक्रवारी (२६ सप्टेंबर) झालेल्या भीषण अपघातात सहा कामगारांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातावेळी सुमारे २०० कामगार उपस्थित होते. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक लाल उम्मेद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार प्लांटमध्ये काम करत असताना जड छतासारखी रचना अचानक कोसळली. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी आणखी लोक गाडले असल्याची भीती वर्तवण्यात येत असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. वरिष्ठ पोलिस अधिकारीही घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी शोक व्यक्त केला. कामगारांच्या मृत्यूची बातमी अतिशय दुःखद आहे. आम्ही संपूर्ण माहिती गोळा करत असून, प्रशासनाला मदत व बचाव कार्य वेगाने पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं ते म्हणाले. रायपूरमधील या अपघातामुळे औद्योगिक सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या दुर्घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.