आर्वी,
Sumit Wankhede : आमदार सुमित वानखेडे यांच्या पुढाकाराने २६ रोजी आर्वी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ‘कर्मयोगी अभियान’ संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आदिवासी गावांचा गाव विकास आराखडा तयार करण्याच्या दिशेने चर्चा करण्यात आली. आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
आमदार वानखेडे यांनी बैठकीत विविध कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले. यामध्ये विशेषतः रस्ता निर्मिती, बंदिस्त गटार, घरकुल, सकस आहार, पाणी पुरवठा योजना, पशुधन विमा, अंगणवाडी इमारत, दिव्यांग व निराधार योजना, आयुष्मान भारत कार्ड आणि उज्वला गॅस योजना यासारख्या अत्यंत मूलभूत सुविधांच्या बाबींवर चर्चा झाली. या योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना त्वरित लाभ मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यत केला.
कर्मयोगी अभियान द्वारे आदिवासी बांधवांना आवश्यक मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध होतील. यामुळे त्यांचे जीवनमान उंचावेल आणि ते विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जातील. आदिवासी समुदायाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी या योजना अत्यंत महत्त्वाच्या ठरतील, असेही आ. वानखेडे यांनी सांगितले. या बैठकीला प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प वर्धा, उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार तसेच विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत अधिकार्यांची उपस्थिती होती.