नागपूर,
Nipun Maharashtra campaign विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्यामध्ये वृद्धी करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात कृती कार्यक्रम राबविला जात आहे. अध्ययन स्तर निश्चिती या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातील 132 पर्यवेक्षकांनी अध्ययन स्तर निश्चितीचे 51.9 टक्के काम पूर्ण केले असून, हे काम पूर्णत्वाकडे जाणार आहे. ‘निपुण भारत’ अभियानाला गती मिळावी आणि राज्यातील इयत्ता दुसरी ते पाचवीतील 37 लाख मुलांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्याचा विकास व्हावा, यासाठी शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेच्या पुढाकारातून वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन, पुणेच्या तांत्रिक भागीदारीने ‘निपुण महाराष्ट्र अॅप’ची निर्मिती करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे संपूर्ण मूल्यांकन एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि पुरावाआधारित पद्धतीने अचूकपणे करणे हे निपुण महाराष्ट्र अॅपचे वैशिष्ट्य आहे. सोबतच शिक्षक, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकीय अधिकारी यांना रीअल टाईम माहितीचे विश्लेषण अॅपवर उपलब्ध होते. त्याचवेळी पालकांनाही पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष ठेवता येते. एआय आधारित वाचन सराव या फीचरद्वारे वाचनाचा वेग, वाचनाची अचूकता, चुकीचे वाचलेले शब्द या बाबी तत्काळ समजतात. दरम्यान, 20 ऑगस्टपासून राज्यभरातील पर्यवेक्षकांकडून या अॅपद्वारे दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर पुनर्मूल्यमापनाचे काम सुरू झाले आहे. राज्यभरातील एकूण 125 पर्यवेक्षक स्वयंप्रेरणेने काम करीत आहेत. आतापर्यंत या पर्यवेक्षकांनी निपुण महाराष्ट्र अॅपचा वापर करीत जवळपास 51.9 टक्के शाळांचे कामकाज पूर्ण केले आहे. अध्ययन स्तर निश्चिती करत असताना विद्यार्थ्यांची मराठी वाचन, लेखन, संख्याज्ञान, संख्येवरील क्रिया या चार विषयांची चाचणी घेण्यात आली.